Dhadak 2 Trailer: 2018 मध्ये करण जोहरने 'धडक' हा चित्रपट मोठ्या पडद्यावर आणला होता, ज्यात समाजातील भेदभावांचे वास्तव सुंदररीत्या दाखवण्यात आले होते. आता त्याच मालिकेतून तो 'धडक 2' हा नवा चित्रपट घेऊन आला आहे. याही वेळी दोन प्रेमवीरांची कथा आहे, ज्यांना सर्व अडथळ्यांवर मात करून एकत्र यायचे आहे. मात्र, समाज त्यांच्या प्रेमाच्या आड येतो.
'धडक 2' चा ट्रेलर झाला प्रदर्शित
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने 'धडक २' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित केला आहे. यात नीलेश आणि विधी नावाचे दोन महाविद्यालयीन विद्यार्थी प्रेमात पडतात. नीलेश ग्रामीण भागातून आलेला साधा मुलगा आहे, तर विधी ही शहरात वाढलेली, समाजाच्या गुंतागुंतींपासून दूर असलेली मुलगी आहे. तिला नीलेशसोबत राहायचे असते, परंतु नीलेश तिच्या जीवाला धोका नको म्हणून सावध असतो.
विधीवर प्रेम केल्यामुळे नीलेशला अनेक प्रकारचे भेदभाव आणि अपमान सहन करावा लागतो. समाज त्याचे जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, विधी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. नीलेशला त्याच्या ओळखीमुळे समाजाने नाकारले आहे. आता त्याच्यासमोर स्वतःची ओळख आणि प्रेमाचे आव्हान आहे, ज्यासाठी त्याला समाजाशी झुंज द्यावी लागते. तो आपल्या प्रेमासाठी समाजाला सामोरे जाऊ शकेल का, हे चित्रपटात पाहायला मिळेल.
चित्रपटातील कलाकार आणि कथानक
'धडक 2' मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती दिमरी प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शाजिया इक्बाल यांनी केले असून, कथा समाजातील जातीय भेदभावावर प्रकाश टाकते. काही कारणास्तव चित्रपटातील काही दृश्ये आणि संवाद बदलण्यात आले तसेच काही दृश्ये कापण्यात आली आहेत.
करण जोहरचा हा चित्रपट येत्या 1 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिद्धांत आणि तृप्ती पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत. ट्रेलरमध्ये दोघांची केमिस्ट्री जबरदस्त दिसून येते. आता ती मोठ्या पडद्यावरही तितकीच प्रभावी ठरेल का, हे पाहणे रंजक ठरेल.