Did You Know About Alia Bhatt Stepmother: हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये 90 च्या दशकामध्ये गाजलेल्या 'आशिकी' चित्रपटाचे आजही अनेक चाहते आहेत. आजही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. अनु आणि राहुलची प्रेमकथा चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. मात्र हा चित्रपट खऱ्या आयुष्यातील एका प्रेमकथेवर आधारित होता, हे फारच कमी लोकांना ठाऊक आहे. स्वत: पूजा भट्टने याबद्दलचा खुलासा केला होता.
पूजा भट्टने बिग बॉसच्या घरात खुलासा करताना आशिकी चित्रपट तिच्या आई-वडिलांच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमकथेवर आधारित होता, असा दावा केलेला. महेश भट्टच्या नादात त्यांच्या पहिल्या पत्नीला शाळेतून हाकलवून लावण्यात आलेलं. महेश भट्ट यांची पहिली प्रेयसीतसेच पत्नी कोण होती ते जाणून घेऊयात...
महेश भट्ट यांनी वयाच्या 20 व्या वर्षी पहिलं लग्न किरण भट्ट नावाच्या मुलीशी केलं होतं. किरण यांच्याकडून महेश यांना पूजा आणि राहुल भट्ट अशी दोन मुलं आहेत. किरण यांचं खरं नाव लॉरने ब्राइट असं आहे. त्या कॅथलिक आहेत. महेश भट्ट यांच्याशी लग्न केल्यानंतर आपलं नाव बदलून लॉरेनऐवजी किरण असं करुन घेतलं.
महेश भट्ट जेव्हा शाळेत होते तेव्हाच त्यांचा जीव लॉरेनवर जडला होता. त्यावेळी लॉरेन बॉम्बे स्टॉकिटश ऑर्फनेजमध्ये शिकत होती. एकदा लॉरनेला भेटण्यासाठी महेश भट्ट चोरुन, शाळेची भिंत ओलांडून गेले होते. मात्र ते पकडले गेले आणि त्यामुळेच लॉरेनला शाळेतून काढून टाकण्यात आलेलं. "मी तिला भेटायला भिंत ओलांडून जायचो. आम्ही पकडलो गेलो तर तिला शाळा सोडावी लागली होती. मी तिला व्हायडबल्यूसीएमध्ये दाखला मिळवून दिला. तिने टायपिस्ट होऊन स्वत: स्वत:चं पोट भरुन खर्च करावा असं मला वाटत होतं. मी सुद्धा माझ्या कामात व्यस्त होतो. मी त्यावेळी डालडा आणि लाइफबॉयसारख्या जाहिराती केल्या," असं महेश भट्ट यांनी एका मुलाखतीत सांगितलेलं.
महेश भट्ट यांच्यामुळे आईला शाळा सोडावं लागलं हे जेव्हा आजीला कळलं तेव्हा ती माझ्या वडिलांना फार ओरडली होती, अशी आठवण बिग बॉसमध्ये पूजा भट्टने सागितलेली. "जर तू माझ्या मुलीला भेटायला भींत ओलांडून येऊ शकतो एवढा मोठा झाला असशील तर तिची जबाबदारीही स्वीकार," अशा शब्दांमध्ये लॉरनेच्या आईने महेश भट्ट यांना सुनावलं होतं. त्यानंतर महेश भट्ट सुद्धा तातडीने ही जबाबदारी स्वीकारण्यात तयार झाले, असं पूजाने सांगितलं.
लॉरेनबरोबर लग्न झाल्यानंतर महेश भट्ट यांचं नाव त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बाबी यांच्याशी जोडलं जाऊ लागलं. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये होते. मात्र परवीन वारंवार आजारी राहू लागल्याने महेश भट्ट तिच्यापासून दूर गेले. त्यानंतर महेश भट्ट यांचा जीव सोनी राजदान यांच्यावर जडला. त्यामुळे महेश भट्ट यांनी लॉरेनला घटस्फोट न देता धर्म बदलून सोनी राजदान यांच्यासोबत लग्न केलं. या दुसऱ्या लग्नामधून त्यांना आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट अशा दोन मुली आहेत.