Sheeba Chadha on Kids and Parenting: शीबा चड्ढा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या 'मुलं जन्माला घालणे टाळा' या वक्तव्यामुळे चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे. जाणून घेऊया, नेमकं शीबा काय म्हणाली.
बॉलिवूडपासून टीव्हीपर्यंत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या शीबा चड्ढाने, सलमान खान, शाहरुख खान यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे. पडद्यावर आई, बहीण आणि पत्नीच्या भूमिका साकारताना ती नेहमीच प्रभावी ठरली आहे. तसेच तिने 'मिर्झापूर'सारख्या लोकप्रिय वेब सीरिजमधूनही प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. मात्र, तिच्या वैयक्तिक आयुष्यात एकटी आई म्हणून तिला असंख्य आव्हानांचा सामना करावा लागला, ज्याचा परिणाम तिच्या विचारसरणीवर झाला.
अलीकडेच या विषयावर बोलताना ती म्हणाली, 'माझ्या मते सध्याच्या परिस्थितीत मूल जन्माला घालणं योग्य नाही. एकट्याने मुलाला वाढवणं केवळ कठीणच नाही, तर मानसिक आणि आर्थिकदृष्ट्याही आव्हानात्मक आहे. अनेकदा आई-बाबा दोघांचा पगारही खर्च भागवायला कमी पडतो. फक्त समाज काय म्हणेल किंवा पालक होण्याची केवळ इच्छा आहे म्हणून मुलं जन्माला घालणं हा चुकीचा निर्णय ठरू शकतो. महागाई, बदलती जीवनशैली, नोकरीतील अस्थिरता, कुटुंबातील तणाव आणि वाढता एकटेपणा यामुळे आजच्या पालकांसमोर संगोपनाची जबाबदारी अधिक जड झाली आहे. पालकत्व ही फक्त भावना नाही, ती एक आयुष्यभराची जबाबदारी आहे आणि ती निभावण्यासाठी तयारी आणि संसाधनं असणं आवश्यक आहे.'
तिने पुढे स्पष्ट केलं की, 'मुलांच्या संगोपनात फक्त प्रेम आणि काळजी पुरेशी नसते, तर त्यांच्यासाठी स्थिर वातावरण, चांगलं शिक्षण आणि सुरक्षित भविष्यही गरजेचं आहे. जर या गोष्टींची पूर्तता करता येणार नसेल, तर मूल जन्माला घालणं टाळावं.'
कामाच्या आघाडीवर शीबा शेवटची अमित गुप्ता दिग्दर्शित 'बकैती' या Zee5 वरील कॉमेडी-ड्रामा वेब सीरिजमध्ये झळकली होती. तिचा पुढील मोठा प्रकल्प नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' असून, यात ती मंथराची भूमिका साकारणार आहे. रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी 2026 मध्ये आणि दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
FAQ
1. शीबा चड्ढा कोण आहे?
शीबा चड्ढा ही बॉलिवूड, टीव्ही आणि ओटीटी जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. तिने सलमान खान, शाहरुख खान यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे आणि 'मिर्झापूर'सारख्या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये झळकल्या आहेत.
2. शीबा चड्ढाने नेमकं काय वक्तव्य केलं आहे?
शीबा चड्ढाने म्हटलं आहे की, सध्याच्या परिस्थितीत मुलं जन्माला घालणं टाळावं. फक्त समाजाचा दबाव किंवा पालक होण्याची इच्छा म्हणून हा निर्णय घेणं चुकीचं आहे.
3. 'रामायण' चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे?
या चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी 2026 मध्ये आणि दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये प्रदर्शित होणार आहे.