South Celebrities in Betting App Scam: दाक्षिणात्य कलाविश्वातून काही बड्या कलाकारांची नावं एकाच वेळी चर्चेत आली असून यामागे कोणत्याही आगामी चित्रपटाचं किंवा तत्सम कारण नसून यामागे कारण आहे एका घोटाळ्याचं. Enforcement Directorate (ED) अर्थात ईजीनं एकदोन नव्हे तर तब्बल 29 सेलिब्रिटींविरोधात कथित बेटिंग App घोटाळ्याप्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. तेलंगणातील हैदराबाद सायबराबाद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या FIR च्या धर्तीवर ईडीनं ही कारवाई केल्याचं म्हटलं जात आहे.
बेटिंग अॅप्सना समर्थन दिल्याबद्दल ईडीनं या 29 सेलिब्रिटींवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणात दक्षिणेकडील गाजलेला आणि बॉलिवूडमध्येही कमालीची लोकप्रियता मिळवलेला अभिनेता विजय देवरकोंडा ते राणा दग्गुबती यांसारख्या बड्या सेलिब्रिटींवरही ईडीनं करडी नजर ठेवली आहे.
उपलब्ध माहितीनुसार ईडी सध्या या प्रकरणात समोर आलेल्या नावाच्या प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक देवाणघेवाणीचा तपशील तपासत असून डिजिटल व्यवहारांचासुद्धा यामध्ये समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी 19 मार्च रोजी मियापूर पोलीस स्थानकात प्रकाश राज, राणा डग्गुबती, मंचू लक्ष्मी आणि निधी अग्रवाल यांच्यावर बेटिंग App ना प्रमोट केल्याचं, त्यांचं समर्थन केल्याचं प्रकरण नोंदवण्यात आलं होतं.
दरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तेलंगणातील 29 चित्रपट कलाकार, युट्यूबर आणि इंस्टाग्राम इंफ्लुएन्सरवर बेकायदेशीर बेटिंग अॅप्सचं Promotion केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
मियापूर येथील 32 वर्षीय व्यापारी फणींद्र शर्मा यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर सदर खटला सुरू झाला आणि त्यातूनच सामान्य नागरिक चित्रपट कलाकारांकडून समर्थन दिल्या जाणाऱ्या या अॅप्समध्ये पैसे गुंतवत आहेत ही बाब समोर आली. तक्रारीनुसार, हे अॅप्स मध्यम आणि निम्न-मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक संकटात टाकत आहेत.
या प्रकरणाचं गांभीर्य पाहता ईडीनं त्याची दखल आर्थिक फसवणूक प्रकरणातील प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) पुढे नेली असून त्यासंदर्भात झालेल्या सर्व व्यवहारांची चौकशी आणि सविस्तर तपशील तपासण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार या अॅप्समध्ये हजारो कोटींचा व्यवहार असून, तरुणांना सहज कमाईचे आमिष दाखवून त्यांचं आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण या माध्यमातून सुरू आहे ही घातक बाब.
अभिनेता विजय देवेराकोंडाच्या वतीनं त्याच्या टीमनं स्पष्ट केल्यानुसार त्यानं फक्त गेमिंग प्लॅटफॉर्म ए23 चं प्रमोशन केलं होतं, जे 2023 मध्ये बंदसुद्धा झालं. यातून चुकीचा हेतू साधला जात असल्याचं लक्षात येताच अभिनेत्यानं त्यापासून दुरावा पत्करला होता. तेव्हा आता या प्रकरणात ईडी पुढे कोणती कारवाई करणार आणि यातून नेमकी कोणती माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.