Kiara Advani: बॉलिवूडमधील सुंदर आणि टॉप अभिनेत्री कियारा अडवाणी आज ती तिचा 34वा वाढदिवस साजरा करत आहे. सिंपल आणि दमदार अभिनयाच्या जोरावर कियारा अडवाणीने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. कियाराने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
कियाराचा जन्म 31 जुलै 1991 रोजी मुंबईत झाला. तिचे वडील जगदीप अडवाणी हे यशस्वी व्यावसायिक आहेत आणि आई जेनेव्हिव जाफरी या शिक्षिका होत्या. शालेय शिक्षण मुंबईतील 'कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल' येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण 'जय हिंद कॉलेज'मधून मास कम्युनिकेशनमध्ये पूर्ण केलं. 12वीमध्ये तिने तब्बल 92% गुण मिळवले होते.
कियारा अडवाणीने कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये सांगितले होते की, 2009 मध्ये आलेली आमिर खानची 'थ्री इडियट्स' पाहूनच तिला अभिनेत्री होण्याची प्रेरणा मिळाली. त्यावेळी ती 12वीमध्ये होती. तिचे हे स्वप्न वडिलांना थोडं अजब वाटलं पण तिच्या जिद्दीपुढे त्यांनीही तिला पाठिंबा दिला. त्यानंतर कियाराचा बॉलिवूड प्रवास सुरू झाला.
कियारा अडवाणीचं मूळ नाव ‘आलिया अडवाणी’ आहे. पण सलमान खानच्या सल्ल्यानुसार तिने 'फगली' सिनेमात पदार्पण करण्याआधी नाव बदलून 'कियारा' केलं. हे नाव तिला प्रियंका चोप्राच्या ‘अंजाना अंजानी’ चित्रपटातील पात्रावरून प्रेरणा घेऊन आवडलं होतं.
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांची प्रेमकहाणी चाहत्यांमध्ये खूपच गाजली होती. त्यांच्या लग्नाने फक्त त्यांच्या फॅन्सच नव्हे तर पूर्ण बॉलिवूडचं लक्ष वेधलं. कियाराची आणि सिद्धार्थची भेट 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शेरशाह' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली. या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं आणि त्यावेळी त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.
सुरुवातीला दोघांनी आपल्या नात्याबाबत खुली कबुली दिली नव्हती. पण मीडिया रिपोर्ट्स, फॅन्सच्या मते आणि दोघांच्या एकत्र स्पॉटिंगमुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना जोर आला होता. 7 फेब्रुवारी 2023 रोजी कियारा आणि सिद्धार्थने राजस्थानमधील सुर्यगढ पॅलेस, जैसलमेर येथे पारंपरिक आणि राजेशाही पद्धतीने विवाह केला.
लग्नात केवळ कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. कियाराने गुलाबी रंगाचा लेहेंगा तर सिद्धार्थने क्रीम रंगाची शेरवानी परिधान केली होती. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. लग्नानंतरही दोघं सतत चर्चेत राहिले. 15 जुलै 2025 रोजी कियाराने एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि आता ते दोघं आनंदी कुटुंबजीवन जगत आहेत.