Marathi News> मनोरंजन
Advertisement

'मला हरामखोर म्हणाले, धमक्या दिल्या,' कुणाल कामरावरुन कंगना आणि हर्षल मेहता भिडले, दिग्दर्शक म्हणाला 'लवकर बरी हो'

Kunal Kamra Row: कुणाल कामरासोबत जे काही झालं ते महाराष्ट्रासाठी काही नवं नाही. आपल्याला याचा सामना करावा लागला होता असं दिग्दर्शक हंसल मेहता यांनी म्हटलं आहे.   

'मला हरामखोर म्हणाले, धमक्या दिल्या,' कुणाल कामरावरुन कंगना आणि हर्षल मेहता भिडले, दिग्दर्शक म्हणाला 'लवकर बरी हो'

Kunal Kamra Row: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरावरील कारवाईवरुन दिग्दर्शक हंसल मेहता आणि अभिनेत्री-खासदार कंगना रणौत भिडले आहेत. कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनगीतामुळे वाद झाला असून, शिवसैनिकांनी मुंबईतील स्टुडिओत तोडफोड करत निषेध व्यक्त केला आहे. तसंच पालिकेने ज्या हॉटेलमध्ये कार्यक्रम पार पडला तेथील अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवला आहे. यानंतर अनेकांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात कंगना रणौतवर झालेल्या कारवाईची आठवण करुन दिली. 

कुणाल कामराविरोधात होणाऱ्या आक्षेपार्ह पोस्टकडे हंसल मेहता यांनी लक्ष वेधलं असता, एका युजरने 2020 मध्ये कंगनाच्या कार्यालयावर बुलडोझर चालवण्यात आला तेव्हा का बोलला नाहीत अशी विचारणा केली. त्यावर हंसल मेहता यांनी उत्तर देत सांगितलं की, "तिच्या घरात तोडफोड करण्यात आली होती का? गुंड तिच्या परिसरात घुसले होते का? त्यांनी तिच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आव्हान देण्यासाठी किंवा कथित एफएसआयचं उल्लंघन केल्याने हे केलं? कृपया मला सांगा. मला कदाचित तथ्य माहिती नसावं".

यानंतर काही वेळातच कंगना रणौतने हंसल मेहता यांना उत्तर दिलं. तिने आपल्यासोबत घडलेला सगळा घटनाक्रम सांगितला. "त्यांनी मला हरामखोरसारख्या नावांनी हाक मारली. त्यांनी मला धमकावलं, रात्री उशिरा माझ्या वॉचमनकडे नोटीस दिली. दुसऱ्या दिवशी कोर्ट सुरु होण्याआधी माझ्या संपूर्ण घरावर बुलडोझर चालवला. हायकोर्टाने ही कारवाई बेकायदेशीर असल्याचं सांगितलं. ते यावर हसले आणि माझ्या वेदना आणि सार्वजनिक अपमानाची मजा घेतली," असं कंगनाने म्हटलं आहे. 

यानंतर मात्र कंगनाने त्यांच्यावर वैयक्तिक टीका करत हंसल मेहता यांचं काम थर्ड क्लास असल्याचं म्हटलं. "असं दिसते की तुमच्या असुरक्षिततेमुळे आणि सामान्यपणामुळे तुम्ही केवळ कटु आणि मूर्खच नाही तर आंधळेही झाला आहात. तुम्ही बनवत असलेल्या काही तृतीय श्रेणीच्या मालिका किंवा क्रूर चित्रपट नाहीत. माझ्या अनुभवांशी संबंधित बाबींमध्ये तुमचे खोटे आणि अजेंडे विकण्याचा प्रयत्न करू नका. त्यापासून दूर राहा," असं ती म्हणाली. यावर हंसल मेहताना यांनी 'लवकर बरी हो (Get Well Soon)' असं थोडक्यात उत्तर दिलं. 

मंगळवारी एका पोस्टमध्ये मेहता म्हणाले की, कुणाल कामरासोबत जे घडले ते "महाराष्ट्रासाठी नवीन नाही" आणि त्यांनीही ते अनुभवले आहे. "पंचवीस वर्षांपूर्वी, त्याच (तेव्हाच्या अविभाजित) राजकीय पक्षाच्या निष्ठावंतांनी माझ्या कार्यालयात घुसून तोडफोड केली, माझ्यावर शारीरिक हल्ला केला, माझा चेहरा काळा केला आणि माझ्या चित्रपटातील संवादाच्या एका ओळीसाठी एका वृद्ध महिलेच्या पाया पडून मला सार्वजनिकरित्या माफी मागण्यास भाग पाडलं," अशी आठवण त्यांनी सांगितली. 

"ही ओळ निरुपद्रवी होती, जवळजवळ क्षुल्लक होती. चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने आधीच 27  इतर कटसह मंजुरी दिली होती. पण त्याचा काही फरक पडला नाही. जवळपास 20 राजकीय व्यक्ती पूर्ण ताकदीने पोहोचल्या आणि 10 हजार प्रेक्षक आणि मुंबई पोलिस शांतपणे पाहत होते. त्या घटनेने फक्त माझे शरीरच दुखावले नाही, आत्माही दुखावला. त्यामुळे माझे चित्रपट निर्मिती मंदावली, माझे धाडस कमी झाले. माझ्यातील काही गोष्टी परत मिळवण्यासाठी मला वर्षानुवर्षे लागली," असं ते पुढे म्हणाले.

"कितीही मतभेद असले तरी, चिथावणी-हिंसा, धमकी आणि अपमान कितीही तीव्र असला तरी ते कधीही समर्थनीय ठरू शकत नाही. आपण स्वतःचे आणि एकमेकांचे ऋणी आहोत. संवाद, मतभेद आणि प्रतिष्ठा यांचे आपण ऋणी आहोत," असंही त्यांनी म्हटलं. 

Read More