Kapil Sharma cafe firing: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडातील सर्रे शहरातील ‘Kaps Cafe’वर पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत गोल्डी ढिल्लों आणि लॉरेन्स बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत इशारा दिला आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे की, 'जय श्रीराम, सत श्री अकाल, राम राम सर्व भावांना. आज कपिल शर्माच्या ‘Kaps Cafe’वर झालेल्या फायरिंगची जबाबदारी गोल्डी ढिल्लों आणि लॉरेन्स बिश्नोई गँग घेत आहे. आम्ही टार्गेटला कॉल केला होता. रिंग ऐकली नाही, म्हणून कारवाई केली. आता देखील रिंग ऐकली नाही तर पुढची कारवाई लवकरच मुंबईत करू.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री कॅफेवर तब्बल 6 राउंड गोळीबार करण्यात आला. 9 सेकंदांचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यात सलग गोळीबाराचे आवाज ऐकू येत आहेत. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाही. सर्रे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.
ही गेल्या एका महिन्यातील दुसरी घटना आहे. याआधी 11 जुलै रोजीही याच कॅफेवर फायरिंग झाली होती. त्या प्रकरणातही अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
सर्रे पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री स्थानिक वेळेनुसार 1.50 वाजता 120 स्ट्रीटच्या 8400 ब्लॉकवरील एका स्थळावर गोळीबाराची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यावर प्रतिष्ठानावर गोळ्या झाडल्याचे आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याचे दिसून आले. त्यावेळी कर्मचारी आत उपस्थित होते. मात्र कोणीही जखमी झाले नाही.
कॅफे व्यवस्थापनाने त्वरित प्रतिसादासाठी पोलिसांचे आभार मानले असून एका जुन्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले होते की, 'हिंसेच्या विरोधात ठाम उभे राहूया आणि ‘Kaps Cafe’ हा समुदायातील एकत्रतेचा आणि आपुलकीचा केंद्रबिंदू राहू देऊया. या दोन्ही हल्ल्यांनंतरही कपिल शर्माने अद्याप या घटनेवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र या गोळीबारांमुळे चाहत्यांमध्ये आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
FAQ
कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार कुठे आणि कधी झाला?
कपिल शर्माच्या ‘Kaps Cafe’वर सर्रे, कॅनडा येथे गुरुवारी रात्री गोळीबार झाला.
या गोळीबाराची जबाबदारी कोणाने घेतली?
गोल्डी ढिल्लों आणि लॉरेन्स बिश्नोई गँगने सोशल मीडियावर पोस्ट करून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
11 जुलैच्या गोळीबार प्रकरणात काय झाले?
11 जुलै रोजी कॅफेवर गोळीबार झाला होता. ज्यामध्ये मालमत्तेचे नुकसान झाले पण कोणीही जखमी झाले नाही. त्या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.