Sairat Fame Rinku Rajguru Dance Video: सोशल मीडियावर अभिनेत्री रिंकू राजगुरुचा 'सैराट झालं जी' या गाण्यावरचा डान्स व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. रिंकूच्या या परफॉर्मन्सवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला असून, अनेकांनी या व्हिडीओला भरभरून प्रेम दिलं आहे.
2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले होते. 100 कोटींचा टप्पा गाठणारा हा पहिला मराठी सिनेमा ठरला होता आणि त्यातील गाणी आजही चाहत्यांच्या ओठांवर आहेत. विशेष म्हणजे 'सैराट झालं जी' , 'झिंगाट' ही गाणी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतं आहेत. 'सैराट झालं जी' या गाण्यावर रिंकूने केलेला डान्स पुन्हा एकदा चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला. व्हिडीओमध्ये रिंकूने एक सुंदर अनारकली ड्रेस परिधान केला आहे आणि तिच्या सोबत प्रसिद्ध कोरिओग्राफर नोएल अलेक्झांडरही डान्स करताना दिसतो.
रिंकूने या व्हिडीओला 'पहिलं ते पहिलंच असतं... सैराट झालं जी' असे कॅप्शन दिले आहे. यावर चाहत्यांनी 'एकदम झकास!', 'मस्तच', 'सैराटचा सिक्वेल काढा आता!' अशा कमेंट्स दिल्या आहेत. अनेकांनी आकाश ठोसरला मिस केल्याचं सांगत, 'फक्त आकाश ठोसरची कमी भासतेय', 'रिंकू-आकाशने पुन्हा एकत्र डान्स करावा' अशा प्रतिक्रिया दिल्या. याचसोबत, काही चाहत्यांनी रिंकूच्या लूकचं खास कौतुक केलं. 'ताईचा पारंपरिक लूक भारी दिसतोय', 'अभिनयाबरोबरच डान्सलाही बेस्ट' अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर येत आहेत. व्हिडीओवर काही तासांतच लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत आणि तो सतत ट्रेंडिंगमध्ये आहे.
हे ही वाचा: तारा-वीर ते श्रद्धा-राहुल: सिनेसृष्टीतील चर्चेत असलेल्या 'या' 7 कथित प्रेमकथा
दरम्यान, रिंकूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'झिम्मा 2', 'झुंड' आणि 'कागर' सारख्या चित्रपटांत झळकली. त्याशिवाय रिंकूने ओटीटी प्लॅटफॉर्ममधील 100 या वेबसिरीजमध्येही काम केले आहे. लवकरच ती 'बेटर हाफची लव्हस्टोरी' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रिंकू प्रार्थना बेहेरे आणि सुबोध भावे यांच्यासोबत दिसणार असून हा चित्रपट 22 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रिंकूने काही बिहाइंड-द-सीन (BTS) फोटोही शेअर केले आहेत, जे चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.