Marathi News> मनोरंजन
Advertisement

'अशी चिक मोत्यांची माळ.. होती गं तीस तोळ्याची गं..'; यातला 'चिक मोती' म्हणजे काय? 99% भक्तांनाही कल्पना नाही

Ashi Chik Motyachi Maal Song Facts: असाही एकही गणेशोत्सव जात नाही जेव्हा आपल्या कानावर 'अशी चिक मोत्याची माळ...' हे गाणं पडत नाही. मात्र या गाण्यातील 'चिक मोती' म्हणजे नेमकं काय? तुम्हाला माहितीये का? त्याबद्दल जाणून घेऊयात...

'अशी चिक मोत्यांची माळ.. होती गं तीस तोळ्याची गं..'; यातला 'चिक मोती' म्हणजे काय? 99% भक्तांनाही कल्पना नाही

Ashi Chik Motyachi Maal Song Facts: 'तो येतोय...' असं म्हणत म्हणत अगदी काही दिवसांवर त्याचा आगमन सोहळा आला आहे. केवळ मुंबई, पुण्यालाच नाही तर देशाबरोबरच जिथे जिथे मराठी, हिंदू बांधव राहतात ते सर्व दरवर्षी आवर्जून ज्याचा वाट पाहतात तो सर्वांचा लाडका गणपती बाप्पा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भक्तांच्या भेटीला येतोय. बाप्पांच्या आगमनाची तयारी सध्या जोरात आहे. बाप्पा येणार म्हणजे मोदक, डेकोरेशनबरोबरच आवर्जून या काळात चर्चेत असतात ती म्हणजे बाप्पाची गाणी! 90 च्या दशकात जन्मलेल्यांना म्हणजेच 90's किड्सला अगदी आजही अनेक मंडळांमध्ये आणि सोशल मीडियावरही अनेक जुनी गाणी ऐकायला मिळतात. यापैकीच एक गाणं म्हणजे, 'अशी चिक मोत्यांची माळ... होती गं तीस तोळ्याची गं...' आत हे गाणं एवढं अंगवळणी पडलं आहे की तुम्ही आधीच्या ओळीत लिहिलेलं नावही अगदी चालीत म्हटलं असणार, हो की नाही? 

चिक मोती म्हणजे काय? गाण्याचा मूळ गायक कोण?

तर याच गाण्यातील चिक मोत्यांच्या माळीबद्दल आपल्यापैकी अनेकजण मागील काही दशकांपासून दरवर्षी किमान गणपतीमध्ये तरी न चुकता गाण्यांमधून ऐकतो. पण हे गाणं ऐकताना अनेकांना प्रश्न पडतो तो म्हणजे 'चिक मोती म्हणजे काय?' साधा मोती आणि चिक मोत्यामध्ये काय फरक असतो? याचबरोबर हे गाणं कोणी लिहिलं, याचे मूळ गायक कोण? याबद्दलही इंटरनेटवर अनेकजण सर्च करताना दिसतात. या गाण्याबद्दल तुम्हालाही असे प्रश्न पडले असतील तर आज आपण त्याचा अर्थ जाणून घेणार आहोत.

हे गाणं लिहिलंय कोणी? सर्वात आधी कोणी गायलं?

'अशी चिक मोत्यांची माळ... होती गं तीस तोळ्याची गं...' हे गाणं सर्वात आधी विलास जैतापकर यांनी लिहिले आणि गायले, अशी नोंद सापडते. त्यांची 'शाहीर विलास जैतापकर पार्टी ' होती. ते या माध्यमातून अनेक कार्यक्रम करायचे. पुढे अनेक गायिकांनी हे गीत गायले. गणपतीची गाणी लिहिण्यात तर विलास जैतापकरांचा हातखंडा होता. अजूनही बहुतेक ठिकाणी गणेशोत्सवात त्यांचीच गाणी वाजतात. शाहीर साबळे यांच्या 'महाराष्ट्राची लोकधारा' या कार्यक्रमातील 'पयलं नमन करितो वंदन...' हे गाणं देखील विलास जैतापकरांनीच लिहिले आहे. 1948 मध्ये जन्मलेल्या विलास जैतापकर यांचं 2005 साली निधन झालं. त्यांची अनेक भक्तीगीते व लोकगीते आजही प्रसिध्द आहेत.

चिक मोती म्हणजे काय?

आता चिक मोत्याची म्हणजे नेमकी कशाची माळ असा प्रश्न हे गाणं ऐकताना तुम्हालाही कधी ना कधी पडला असेल. तर चिक मोती हे मोत्याला दिलेलं विशेषण असल्याचं सांगितलं जातं. ज्याप्रमाणे आपण मोत्यांना पांढरे शुभ्र असे विशेषण लावतो त्याचप्रमाणे पूर्वी पांढऱ्या शुभ्र मोत्यांना चिक मोती म्हणयाचे. यातील चिक या शब्दाला गायीच्या दुधाचा संदर्भ आहे. गायीला वासरु झाल्यानंतर तिच्या पहिल्या दुधापासून जो चिक बनवतात तो अगदी पांढरा शुभ्र असतो. अशाच नैसर्गिकरित्या पांढऱ्या शुभ्र गोष्टींना संबोधण्यासाठी चिक हा शब्द वापरला जायचा. त्यावरुनच गाण्यात चिक मोती हा शब्द वापरल्याचं सांगितलं जातं. 

अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर, चिक मोती म्हणजे गायीच्या दुधाच्या चिकासारखा रंग असणारे अस्सल नैसर्गिक पांढऱ्या रंगाचे मोती!

दाक्षिणात्य संदर्भातून चिक मोत्याचा अर्थ नेमका काय?

अन्य एका संदर्भामध्ये गणरायचे दक्षिण भारतातही मोठ्या प्रामाणात भक्त आहेत. त्यामुळेच हा चिक शब्द काहीजण  लहान या अर्थानेही घेतात. म्हणजेच लहान, नाजूक मोत्यांची माळ अशा अर्थाने दक्षिणेतील चिक या शब्दाचा अर्थ घेतला जातो. चिक या शब्दाचा कानडीत 'लहान' असा अर्थ होतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे दक्षिणत असलेलं चिक मंगळूरु हे शहर! छोटं मंगळूरु असं या शब्दातून अभिप्रेत आहे. तेच चिक मोत्यामधून सांगायचं आहे, असंही मानलं जातं.

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Read More