अभिनेत्री गौतमी कपूरने (Gautami Kapoor) बालपणी एका घटनेमुळे आपल्याला प्रचंड मानसिक धक्का बसल्याचा खुलासा केला आहे. मी सहावीत असताना सार्वजनिक बसमध्ये एका व्यक्तीने आपल्या गैरवर्तन केल्याची आठवण गौतमी कपूरने सांगितली आहे. Hauterrfly ला दिलेल्या मुलाखतीत गौतमी कपूरने कशाप्रकारे एका अनोळखी व्यक्तीने गैरवर्तन केलं आणि त्यावर आपल्या आईची काय प्रतिक्रिया होती हे सांगितलं आहे.
गौतमीने खुलासा केला की, आमच्याकडे गाडी नसल्याने पाचवीमध्ये असल्यापासून मी बसने प्रवास करत होते. सहावीत असताना बसमध्ये प्रवास करताना एका व्यक्तीने आपला विनयभंग केली होती. "एका व्यक्तीने मागून माझ्या पँटमध्ये हात घातला. मी त्यावेळी फार लहान होते, यामुळे नेमकं काय सुरु आहे हे समजण्यासाठी वेळ लागला. मी फार घाबरले आणि तात्काळ बसमधून खाली उतरले. मला सगळी स्थिती समजण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागली. तो व्यक्ती माझा पाठलाग करत आहे असं मला भासत होते. जेव्हा मी आईला भेटले तेव्हा तिला हे सगळं सांगण्यास घाबरत होती. मला वाटलं की, ती मला ओरडेल आणि तुझीच चूक आहे असं सांगेल".
जेव्हा हा सगळा प्रकार घडला तेव्हा मी शाळेच्या गणवेशात होते असं गौतमीने सांगितलं. आईची काय प्रतिक्रिया होती याची आठवण करताना तिने सांगितलं की, "मी जेव्हा घरी पोहोचले आणि आईला सांगितलं तेव्हा ती म्हणाली, तू वेडी आहेस का? ती मागे वळून त्याच्या कानाखाली मारायला हवी होती. त्याची कॉलर पकडायला हवी होती. तिने मला अजिबात घाबरायचं नाही असं सांगितलं. जर पुन्हा कोणी असं केलं तर त्याचा हात घट्ट पकड आणि जोरात ओरड. कधीही घाबरु नको. जर तुला भिती वाटली तर सोबत पेपर स्प्रे ठेव किंवा तुझा बूट काढ आणि मार. तुला काही होणार नाही".
गौतमी कपूरने सॅटरडे सस्पेन्स आणि फॅमिली नंबर 1 या टेलिव्हिजन शोमधून अभिनयाला सुरुवात केली. घर एक मंदिर या शोमुळे ती घराघरात पोहोचली. 'कहता है दिल', 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' आणि इतर शोमध्ये तिने भूमिका महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.
गौतमीने प्यार तुने क्या किया, फना, स्टुडंट ऑफ द इयर, शादी के साइड इफेक्ट्स आणि इतर अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ती शेवटची 'ग्यारा ग्यारा' या मालिकेत दिसली होती. या मालिकेत कृतिका कामरा, राघव जुयाल आणि धैर्य करवा देखील आहेत.