मुलं वयात आल्यावर त्यांच्यावर लैंगिक आयुष्यावर चर्चा करणं पालकांसाठी फार अवघड असतं. आपल्याकडे आधीच या विषयावर उघडपणे बोलणं हे फार लाजिरवाणं मानलं जातं. असा स्थितीत मुलांना त्याबद्दल जागरुक करणं पालकांसाठी आव्हान असतं. मात्र अभिनेत्री गौतमी कपूरने आपण मुलगी 16 वर्षांची होताच तिच्याशी या विषयावर खुलेआमपणे चर्चा केल्याचा खुलासा केला आहे. गौतमी कपूर अभिनेता राम कपूरची पत्नी आहे. नुकतंच एका मुलाखतीत, गौतमी कपूरने मुलीला योग्य निर्णय घेण्यास मदत व्हावी यासाठी एक सेक्स टॉय खरेदी करण्याची तयारी केल्याची आठवणही सांगितली.
मुलीशी शारिरीक संबंध आणि आत्मशोध या विषयावर चर्चा करण्यासाठी कशाप्रकारे पुढाकार घेतला यावर बोलताना तिने सांगितलं की, "मुलगी 16 वर्षांची झाली तेव्हा मी तिला काय भेटवस्तू द्यायची याचा विचार करत होते. नंतर मी तिला सेक्स टॉय किंवा वायब्रेटर देण्याचा विचार केला. मी मुलीला याबाबत विचारलं असता ती म्हणाली, 'आई तुला काही कळतंय का? तू वेडी झाली आहेस का?' मी तिला म्हटलं की, याबद्दल विचार कर. किती आई आपल्या मुलीला अशी काही भेटवस्तू देण्याचा विचार करत असतील?. तू प्रयोग करुन का पाहत नाहीस".
आपण नेमका काय विचार करत होतो यावर बोलताना तिने सांगितलं की, "जे माझ्या आईने माझ्यासोबत केलं ते मला माझ्या मुलीसोबत करण्याची इच्छा नाही. तिने प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यावा असं मला वाटतं. अनेक महिला आयुष्यात हे सुख अनुभवत नाहीत. अशा स्थितीत का जावं? आज माझी मुलगी 19 वर्षांची आहे आणि आता ती कौतुक करते की किमान मी हा विचार केला".
अलीकडेच, राम कपूर आपलं वजन प्रचंड कमी केल्याने चर्चेत आला होता. त्याने यासाठी ओझेम्पिकचा वापर केल्याचा आरोप अनेकांनी केला होता. गौतमीने स्थूलपणाशी झुंजणाऱ्या आपल्या मुलीनेच रामला वजन कमी करण्यास प्रेरित केलं असं सांगितलं आहे.
"लोक फक्त निकाल पाहतात, मात्र कठीण बाजू पाहत नाहीत. मला त्याचा अभिमान वाटतो. त्याने मानसिक, भावनिक आणि शारिरीकदृष्ट्या फार काही सहन केलं आहे. आमची मुलगी सियाने फार वजन कमी केलं आहे. तिने रामच्या आधी आपला फिटनेस प्रवास सुरु केला होता. त्यामुळेच रामलाही प्रेरणा मिळाली," असं गौतमीने सांगितलं आहे.
गौतमी कपूर आणि राम कपूर यांनी 2003 मध्ये लग्न केलं. घर एक मंदिर या टीव्ही शोच्या सेटवर भेटल्यानंतर त्यांनी एकमेकाला डेट करण्यास सुरुवात केली. त्यांना सिया नावाची मुलगी आणि अक्स कपूर नावाचा मुलगा आहे.