विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक आता हिंदीमध्ये येणार आहे. मराठी आणि भारतीय रंगभूमी गाजवल्यानंतर आता हे नाटक हिंदीत प्रेक्षखांच्या भेटीला येणार आहे. काशीराम कोतवाल हे नाटक हिंदीमध्ये व्यावसायिक रंगभूमीवर येत असल्याची घोषणा प्रसिद्ध चित्रपट निर्माते, लेखक, दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. ‘घासीराम कोतवाल’ असे या नाटकाचे हिंदी नाव असून या नाटकातील कलावंतांचा संच ५० जणांचा आहे. सुप्रसिद्ध अभिनेता संतोष जुवेकर हे या नाटकात घाशीराम कोतवालची प्रमुख भूमिका साकारणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुण्यातील एरंडवणे येथील द बॉक्स येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. यावेळी नाटकातील प्रमुख कलाकार संतोष जुवेकर, किरण यज्ञोपवित, निर्मात्या आकांशा ॐकार माळी, दिग्दर्शक भालचंद्र कुबल, संगीत दिग्दर्शक मंदार देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर नाटक हिंदीमध्ये व्यावसायिक रंगभूमीवर यावे व प्रत्येक भारतीयापर्यंत पोचावे ही संकल्पना अभिजित पानसे यांची असून त्यांनीच नाटकाचे आरेखन केले आहे. याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले, “घाशीराम कोतवाल हे मानवी मनात दडलेल्या व जीवनातील क्रौर्याचे दर्शन घडविणारे नाटक असल्याचे काळाच्या प्रवाहाबरोबर सिद्ध झाले आहे. एखाद्या कलाकृतीचे श्रेष्ठत्त्व सिद्ध होण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागतो. तसा घाशीराम कोतवाल नाटकासाठी हा काळ गेला असून हे नाटक आता कालातित नाटकांच्या यादीत आपले स्थान टिकवून आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ‘घाशीराम कोतवाल’चा पहिला प्रयोग १६ डिसेंबर, १९७२ साली झाला त्याला ५२ वर्ष पूर्ण झाली आहेत. हे नाटक आजवर भारतातील अंदाजे १० भाषांमधून तर जगातील ३ भाषांमध्ये सादर झाले. मात्र हिंदीमध्ये हे नाटक व्यावसायिक दृष्ट्या सादर केले गेले नव्हते. हेच लक्षात घेत आम्ही हे नाटक हिंदीत आणण्याचे ठरविले.”
‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक अमराठी प्रेक्षकांपर्यंत पोचविण्याच्या हेतून आम्ही ते हिंदीत सादर करीत असून आकांक्षा ॐकार माळी यांनी नाटकाचे शिवधनुष्य निर्मात्याच्या भूमिकेतून उचलले आहे. या नाटकाचा बाज आजच्या काळाला अनुसरुन असून सादरीकरणाच्या दृष्टीने काही महत्त्वाचे बदल आम्ही केले असल्याचेही पानसे यांनी नमूद केले.
घाशीराम कोतवाल हे गाजलेले पात्र तब्बल ५० कलावंताच्या संचासोबत सादर करण्यासाठी मी देखील उत्सुक असल्याचे संतोष जुवेकर म्हणाले. घाशीराम कोतवाल मूळ नाटकात नृत्य व संगीताला महत्त्वाचे स्थान होते, याची जाणीव असल्याने हिंदी नाटकातही तो बाज सांभाळण्याचा प्रयत्न आम्ही केला असल्याचे संगीत दिग्दर्शक मंदार देशपांडे यांनी सांगितले.