Marathi News> मनोरंजन
Advertisement

'मी नेमकी कोणासाठी गात आहे?,' ...जेव्हा ए आर रहमानसाठी गाणं शूट करताना लता मंगेशकर संतापल्या; गुलजार म्हणाले 'मी स्टूल घेऊन...'

गुलजार यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितलं की, एआर रहमान हा एक वेडसर आहे आणि त्याला मदत करण्यासाठी जास्त लोकांची गरज नसते. बहुतेक तो एकटाच काम करण्यास प्राधान्य देत असतो.   

'मी नेमकी कोणासाठी गात आहे?,' ...जेव्हा ए आर रहमानसाठी गाणं शूट करताना लता मंगेशकर संतापल्या; गुलजार म्हणाले 'मी स्टूल घेऊन...'

ऑस्कर-विजेता संगीतकार ए.आर. रहमान याच्याबद्दल फार काही बोलण्यासारखं किंवा लिहिण्यासारखं नाही असं वाटतं तेव्हाच कुठूनतरी एक नवीन किस्सा समोर येतो, जो त्याच्याबद्दल काहीतरी नवीन सांगतो. हे ऐकल्यानंतर त्याच्याबद्दल असणारं कौतुक आणखी वाढतं. त्यात जर हा किस्सा त्याच्यासह काम करणारे त्याचे सहकारी सांगत असतील तर तो अधिक मनोजरंक ठरतो. यातूनच तो एक परिपूर्ण GOAT (सर्वकाळातील सर्वोत्कृष्ट) का आहे हे अधोरेखित होतं. अलीकडे, प्रख्यात कवी आणि गीतकार गुलजार यांनी रहमानच्या कार्यशैलीबद्दल एक रंजक माहिती शेअर केली. तो एक वेडसर व्यक्ती असून, त्याला कामात फार लोकांच्या मदतीची गरज नसते असं त्यांनी सांगितलं. 

गुलजार यांनी O2india शी संवाद साधताना ए आर रहमान बहुतेक एकटाच काम करण्यास प्राधान्य देतो, त्याच्यासह फक्त एक सहाय्यक असतो असा उल्लेख केला. “बहुतेक वेळा संपूर्ण स्टुडिओमध्ये तो एकटाच असतो. तो मोठ्या रेकॉर्डरसोबत एकटाच बसलेला असायचा आणि स्वत: गोष्टीही करायचा. तो त्यात तज्ज्ञ आहे. फक्त कधी कधी वायर जोडण्यासाठी त्याच्याकडे एखादा सहाय्यक असतो. इतक्या मोठ्या स्टुडिओत फक्त दोन लोक असतात. यापूर्वी कधी मी अशा प्रकारचं रेकॉर्डिंग पाहिलेलं नाही. तिथे खूप एकटं वाटतं".

शाहरुख खान आणि मनीषा कोईराला यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या दिल से (1998) चित्रपटासाठी गुलजार यांनी लिहिलेल्या 'जिया जले' गाण्यासाठी लता मंगेशकर यांनी आवाज दिला. यानिमित्ताने लता मंगेशकर आणि ए आर रहमान यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं होतं. हे गाणं रेकॉर्ड करताना लता मंगेशकर यांना एकाकीपणा जाणवत होता असं गुलजार यांनी सांगितलं. 

“रेहमानसोबत काम करण्याची त्यांची (लता मंगेशकर) पहिलीच वेळ होती. रहमान जिथे बसून रेकॉर्ड करत असतो ते गायकाला दिसत नाही. सहसा आपण गायकासमोर (रेकॉर्डिंग बूथला लागून असलेल्या दुसऱ्या खोलीत) हातवारे करून सूचना देत असतो. तेव्हा आताच्या तुलनेत रहमानला हिंदी नीट समजत नव्हती. काही वेळाने लताजी यांनी मला हिंदीत विचारलं की, ‘मला कोणी समोर दिसत नाही., मी कोणासाठी गात आहे?. त्यांचा कोणाशीही थेट संपर्क होत नसल्याने मलाही विचित्र वाटलं. तुम्ही एकट्यात गाणी गाऊ शकत नाही आणि कविताही बोलू शकत नाही," असं गुलजार म्हणाले. 

"मी रहमानला हे समजावून सांगितलं आणि त्याला सांगितले की मी दारासमोरच्या एका स्टूलवर बसेन, जे त्या दोघांनाही दिसत आहे. अशा प्रकारे, त्यांना मी दिसत होता आणि गाण्याचे रेकॉर्डिंग पूर्ण झालं," असं त्यांनी सांगितलं. 

Read More