Pakistani Fan vs Indian TV Actress : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रीने एका पाकिस्तानी चाहत्याला एक्स (आधीचं ट्वीटर) या समाजमाध्यमावर चांगलेच सुनावले आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यान सुरु असलेल्या संघर्षादरम्यान एका पाकिस्तानी व्यक्तीने या अभिनेत्रीला तिच्या मुस्लीम नवऱ्याला सोडून देण्याचा सल्ला दिला. स्वत:ला या अभिनेत्रीचा चाहता म्हणवणाऱ्या या व्यक्तीने अभिनेत्रीवर 'द्वेष पसरवते' असा आरोप केल्यानंतर दोघांमध्ये सोशल मीडियावरच बाचाबाची झाली. निर्मात्यांनी या अभिनेत्रीला काम दिल्यास ती असा द्वेष पसरवणार नाही, असा टोमणा मारणाऱ्या चाहत्याचा अभिनेत्रीने चांगलाच समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं. नेमकं घडलं काय जाणून घेऊयात...
ज्या अभिनेत्रीबरोबर हा सारा प्रकार घडला तिचं नाव आहे, देवोलीना भट्टाचार्य! देवोलीनाचं लग्न शहानवाज शेखसोबत झालं आहे. 39 वर्षीय अभिनेत्रीने 2022 मध्येच शहानवाजबरोबर लग्न केलं असून त्यांचा संसार अगदी सुखाने सुरु आहे. 'स्टार प्लस'वरील 'साथ निभाना साथिया' या मालिकेमध्ये साकारलेल्या गोपी मोदीच्या भूमिकेमुळे देवोलीना घराघरात पोहचली आहे. तिने बिग बॉस 13, बिग बॉस 14 आणि बिग बॉस 15 मध्येही भाग घेतला होता. नावाजलेल्या मालिकांमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या देवोलीनाला एका पाकिस्तानी चाहत्याने मुस्लीम नवऱ्याला सोडण्याचा सल्ला दिला. हा सल्ला वाचून देवोलीनाने त्याला याच माध्यमावरुन सडेतोड उत्तर दिलं आहे.
पाकिस्तानी चाहत्याने आपल्या पोस्टमध्ये, "मी सर्व भारतीय निर्मात्यांना विनंती करतो की त्यांनी देवोलीनाला काम द्यावं. ही घरी बसून वेडी झाली आहे. सतत ती केवळ द्वेष पसरवत असते. मला तिचा चाहता असल्याबद्दल वाईट वाटतंय. तिचं तोंड घाणेरडं आहे. ती वेडी आहे. इस्लामचा एवढा द्वेष वाटतोय तर तुझ्या नवऱ्याला सोडून दे! घटीया विचारसरणीची महिला," असं म्हणत देवोलीनावर निशाणा साधलेला.
नक्की वाचा >> सलमानला पाकिस्तानचा पुळका? लोक संतापल्याने 'ती' पोस्ट Delete; म्हणालेला, 'देवाचा आभारी आहे की..'
"हाहाहा... आता यांना माझ्या कामाची काळजी वाटतेय. यांचा स्वत:चा काही भरोसा नाही. अरे जाऊन स्वत:च्या देशाला आणि दहशतवादी तळांना संभाळा. दोन दिवसात तुमच्या लष्करावर अंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून भीक मागण्याची वेळ आली आहे. माझ्या नवऱ्याची काळजी करुन स्वत:चं रक्त आटवण्याचा काहीच उपयोग नाही. तुम्ही तुमच्या देशात ज्या दहशतवाद्यांना आश्रय दिला आहे त्यांना भारत सरकारकडे सोपवा... माझ्यामुळे उगाच गरीब लोकांना त्रास होतोय," असं खोचक उत्तर देवोलीनाने या पोस्टवर दिलं आहे.
Hahaha…ab inko fikar hai mere kaam ki..jinki khudka koi bharosa nahi…Arey jakar apna desh aur terror camps sambhal. 2 din mein teri army international funds se bheeg maangne pe agayee hai..meri pati ki fikar mein apna khoon mat jala itna..Jo terrorists paal rakhe hai apne desh… https://t.co/NgJalJKfBo
— Devoleena Bhattacharjee (@Devoleena_23) May 9, 2025
देवोलीनाचा पती शाहनवाज हा जीम ट्रेनर असून दोघांनी 2022 मध्ये लग्न केलं. 18 डिसेंबर 2024 रोजी दोघांना पुत्ररत्न प्राप्ती झाली.