Marathi News> मनोरंजन
Advertisement

'आमच्या काळात गोलंदाज...', गावसकरांनी कपिल देव, श्रीनाथ यांचा उल्लेख करत सुनावलं, 'कधी जीममध्ये गेले नाहीत, पण...'

कपिल देव आणि श्रीनाथ त्यांच्या काळात फिटनेस कशाप्रकारे हाताळत होते यावर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी भाष्य केलं आहे.   

'आमच्या काळात गोलंदाज...', गावसकरांनी कपिल देव, श्रीनाथ यांचा उल्लेख करत सुनावलं, 'कधी जीममध्ये गेले नाहीत, पण...'

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार लिटिल मास्टर सुनील गावसकर गोलंदाजांनी जीममध्ये अवजड व्यायाम करण्याच्या विरोधात आहेत हे आता सर्वश्रुत आहे. याआधीही भूतकाळात त्यांनी यावर परखड भाष्य केलं आहे. जीममध्ये अवजड वजनं उचलणं अनेक जलदगती गोलंदाजांच्या पाठीच्या दुखापतीचं कारण असल्याचं गावसकरांचं मत आहे. आपल्या या मताला दुजोरा देण्यासाठी पूर्वीच्या गोलंदाजांची उदाहरणं दिली आहेत, जेव्हा खेळाडू जीममध्ये जात नसताना तुलनेने कमी दुखापत होत होती. अलीकडेच, गावसकर यांनी त्यांच्या काळातील गोलंदाजांच्या तंदुरुस्तीबद्दल पुन्हा एकदा भाष्य करत सध्याच्या गोलंदाजांना लक्ष्य केलं, जे जिममध्ये जड वजन उचलण्यावर जास्त लक्ष केंद्रित करतात.

"कपिल देव आणि जवागल श्रीनाथ यांच्यासारखे वेगवान गोलंदाज मर्यादित संसाधनं, तंत्रज्ञान आणि मर्यादित रिकव्हरी प्रोसेस असतानाही कसे काय सलग क्रिकेट खेळत होते?", असा प्रश्न भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान गावसकर यांना विचारण्यात आला. त्यावर गावसकरांनी उपहासात्मकपणे उत्तर देत, 'जे आपल्या कामासाठी गरजेचं आहे ते सर्व ते करत होते' असं म्हटलं. 

"ते कशाप्रकारे खेळले? मला वाटतं त्यांची ट्रेनिंग आता वेगळी होती. कपिल देव कधीतरीच जीममध्ये जात होते. ते फक्त धावायचे आणि नेटमध्ये पाच ते सहा फलंदाजांना गोलंदाजी करायचे. त्यानंतर ते पुन्हा यायचे आणि फलंदाजी करत काही वेळाने पुन्हा गोलंदाजी करायचे. थोडक्यात ते त्यांच्या कामासाठी जे गरजेचं होतं ते करत होते. ते ज्यात तज्ज्ञ होते त्यात फक्त आणि फक्त गोलंदाजीची अपेक्षा होती. त्यामुळे त्याचे गोलंदाजीचे स्नायू आणि संपूर्ण शरीर गोलंदाजीच्या सवयीचे झाले होते. ते फार उत्तम हुशार खेळाडू होते. मला वाटतं ते कोणत्याही खेळात चॅम्पिअन झाले असते. जे त्यांच्या कामात गरजेचं असतं ते करतात. त्यावेळी क्रिकेट खेळणं आणि त्याचा सराव करणं हेच काम होतं," असं गावसकर म्हणाले आहेत.

विशेष म्हणजे, वेगवान गोलंदाजांना होणाऱ्या दुखापती आता क्रिकेटमध्ये एक गंभीर चिंतेची बाब बनली आहे, ज्यामध्ये भारतीय वेगवान गोलंदाजांचाही समावेश आहे. संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला यापूर्वी दुखापतींशी झुंजावं लागले आहे आणि त्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याला इंग्लंडमधील पाच कसोटी सामन्यांपैकी फक्त तीन सामन्यांमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलाही यापूर्वी दुखापतींचा सामना करावा लागला आहे. उदयोन्मुख वेगवान गोलंदाज मयंक यादव आणि उमरान मलिक यांनाही दुखापतींमुळे अनेक क्रिकेट सामने गमवावे लागले आहेत.

Read More