Gaurav More Viral Video: 'चला हवा येऊ द्या' फेम गौरव मोरे त्याच्या विनोदी अभिनयशैलीमुळे आणि अचूक टायमिंगमुळे रसिकांच्या मनात घर करून आहे. 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणून ओळखला जाणारा गौरव, यापूर्वी 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' (MHJ) या लोकप्रिय कॉमेडी शोमध्येही झळकला होता. या शोमधून त्याने स्वतःची खास ओळख निर्माण केली होती आणि त्याच्या पात्रांमधील वेगळ्या शैलीमुळे तो प्रचंड चर्चेत आला होता. महाराष्ट्रातील हास्य जत्रेमधील त्याच्या अभिनयामुळेच त्याला पुढे 'चला हवा येऊ द्या'सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर काम करण्याची संधी मिळाली.
आता गौरव पुन्हा एकदा नव्या भूमिकेसह प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज आहे. 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या सीझनमध्ये तो 'गँगलॉर्ड्स'पैकी एक म्हणून दिसणार आहे.
याच पार्श्वभूमीवर त्याने सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गौरव फोनकडे पाहत भावनिक संवाद साधताना दिसतो. तो म्हणतो - 'जानू मला कळत नाहीये तुला कसं सांगू. 30 दिवस मी तुझ्याशी संपर्कात नसेन. ब्लॉक नाही करणार, फक्त म्युट करेन. आपली ही शेवटची भेट. आपण एकत्र किती मजा केली - न्यू इयर पार्टी, बॅचलर पार्टी, रविवारी दुपारच्या पार्टी... ऑफिसचा तणावही तुझ्यामुळे कमी झाला. पण आता तुला सोडावं लागेल. काळजी घे, बाय!'
या व्हिडीओला 'झी मराठी'ने कॅप्शन दिलंय - 'आपल्या लाडक्या गौरवला सपोर्ट करा, तुम्हीपण 'ती'ला महिनाभर ब्लॉक करा.'
हे ही वाचा: भर कार्यक्रमात येताच साराची चप्पल तुटली, अभिनेत्रीने पुढे जे केलं ते कौतुकास्पद, पाहा Video
गौरवचा हा व्हिडीओ पाहून सुरुवातीला तो कोणत्या मुलीशी बोलतोय असं वाटतं, पण शेवटी ट्विस्ट उघड होतो. कारण फोनच्या स्क्रीनवर दिसते ती मुलगी नसून... एक कोंबडीचा फोटो आहे. श्रावण सुरू होत असल्याने अनेक लोक या काळात मांसाहार टाळतात. धार्मिक आणि शास्त्रीय कारणांमुळेही हा प्रघात पाळला जातो. गौरवनेही याच पार्श्वभूमीवर हा मजेदार व्हिडीओ तयार केला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर तो जबरदस्त व्हायरल झाला आहे. दरम्यान, गौरव मोरे 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वात 26 जुलैपासून झळकणार आहे. शनिवार-रविवारी रात्री 9 वाजता हा शो 'झी मराठी'वर प्रेक्षकांच्या भेटीला येईल.