Sachin Pilgaonkar-Amitabh Bachchan : आपल्या सगळ्यांचे महागुरु अर्थात लोकप्रिय मराठमोळे अभिनेते सचिन पिळगावकर हे अभिनयासोबत, दिग्दर्शक, निर्माते आणि गायक असा सगळ्या भूमिकांमध्ये आपल्याला दिसतात. त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सचिन पिळगावकर यांनी फक्त मराठी नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीत देखील काम केलं आहे. ते नेहमीच त्यांच्या कामाविषयी अनेक गोष्टी आणि पडद्यामागचे किस्से सांगताना दिसतात. त्यांनी एका मुलाखतीत अमिताभ यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या आठवणींविषयी सांगितलं आहे.
सचिन पिळगावकर यांनी 'लोकमत फिल्मी'ला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या नात्याविषयी बोलताना ते म्हणाले "अमिताभ आणि मी, आमचं दोघांचं नातं खुप चांगलं आहे. इतर लोक त्यांना अमितजी म्हणतात. काही लोक त्यांना बच्चन साहेब म्हणतात. मी त्यांना भाई म्हणतो. खरंतर आमचं नात हे ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटापासून सुरु झाला. त्याआधी आम्ही ‘शोले’मध्ये एकत्र काम केलं होतं. त्यानंतर आम्ही ‘त्रिशूल’मध्ये सुद्धा एकत्र काम केलं होतं.'
पुढे 'सत्ते पे सत्ता'मध्ये कशी मैत्री वाढली याविषयी सांगत ते म्हणाले, " ‘सत्ते पे सत्ता’ चित्रपटामुळे आमच्यात आणखी चांगली मैत्री झाली. असं असलं तरी मी अमिताभ यांच्यापेक्षा जया बच्चन यांच्या अधिक जवळ आहे. मी त्यांच्यासोबत तसं एकाही चित्रपटात काम केलेलं नाही. पण त्या माझ्याशी खूप चांगल्या वागतात."
हेही वाचा : 'चला हवा येऊ द्या' पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
जया यांच्यासोबत कसं नातं आहे याविषयी सांगत सचिन पिळगावकर म्हणतात, "जयाजी माझे खूप लाड करतात आणि अनेकदा अमितजींना ते आवडत नाही. कधी कधी ते म्हणतात ‘ये जया के दहेज में आया है’. त्यांना कदाचित असं वाटतं की, त्याचं आणि तिचं नातं इतकं चांगलं कसं आहे? माझ्यासोबत का नाही? पण ठीक आहे. अमिताभजी आणि मी, आम्ही एकत्र चित्रपट केले. पण त्यांच्याबरोबर एवढी जवळीक झाली नाही, तर मी जया यांच्यासोबत एकदाही काम केलं नाही. तरी सुद्धा आम्ही सगळे एकत्रच आहोत."