Marathi News> मनोरंजन
Advertisement

KBC 13 : 'शोले'ची 'बसंती' समोर येताच बिग बींनी विचारला असा प्रश्न; उत्तर देत म्हणाली, 'जब देखो ड्रामा...'

बसंती, बिग बी आणि बरंच काही.... 

KBC 13 : 'शोले'ची 'बसंती' समोर येताच बिग बींनी विचारला असा प्रश्न; उत्तर देत म्हणाली, 'जब देखो ड्रामा...'

मुंबई : 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाच्या 13 व्या पर्वाला चांगलीच लोकप्रियता मिळताना दिसत आहे. कलाकारांची आणि स्पर्धकांची उपस्थिती या कार्यक्रमाच्या जमेची बाजू आहेच. पण, बिग बी अमिताभ बच्चन यांचं सूत्रसंचालान केबीसीला चार चाँद लावून जात आहे. नुकतीच या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते रमेश सिप्पी यांनी हजेरी लावली होती. 

हेमा मालिनी, रमेश सिप्पी, अमिताभ बच्चन एकाच मंचावर... तुमचंही डोकं चाळवलं ना? जर 'शोले' या चित्रपटाचं नाव तुम्हाला सुचत असेल तर, हो हे अगदी योग्य आहे. हिंदी चित्रपट जगतात मैलाचा दगड ठरलेल्या या चित्रपटाला तब्बल 46 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्तानं कलाकारांची ही खास सांगड घातली गेली. 

चित्रपटाच्या आठवणी आणि अनेक गप्पांनी केबीसीचा हा भाग रंगला आणि याचीच झलक सध्या सोशल मीडियावर सर्वांच्याच चेहऱ्यावर स्मित आणत आहे. KBC 13 च्या या नव्या भागाच्या प्रोमो व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन त्यांच्या अंदाजात, अगदी 'शोले' प्रमाणेच तुम्हारा नाम क्या है बसंती... असा प्रश्न हेमा मालिनी म्हणजेच बसंतीला विचारताना दिसत आहेत. 

बच्चन यांच्या या प्रश्नाचं उत्तर हेमा मालिनी त्यांच्याच अंदाजात देत आहेत. ज्यामुळं तेथे सेटवर असणारेही हसू रोखू शकलेले नाहीत हे या काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. एका चित्रपटाला मिळालेली लोकप्रियता नेमकी कोणती उंची गाठू शकते हेच 'शोले'नं सिद्ध केलं आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांनाच पुन्हा एकदा त्या दिवसांची आठवण झाली असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

Read More