'द आर्चीज' जोडी पुन्हा चर्चेत: झोया अख्तरच्या 2023 मधील 'द आर्चीज' या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या वेदांग आणि खुशी यांचे रिलेशनशिपबाबत अनेक चर्चा आहेत. हे दोघं अनेकवेळा एकत्र दिसले आहेत. अलीकडेच सोनम कपूरच्या लंडनमधील बर्थडे पार्टीत आणि वेदांगच्या 25 व्या वाढदिवशी देखील दोघं एकत्र होते, ज्यामुळे त्यांच्या नात्याच्या चर्चा अधिकच रंगल्या आहेत.
नातं लपवलेलं... पण पुरावे स्पष्ट?
1 मे रोजी अनिल कपूरच्या मुंबईतील घरी झालेल्या सोनमच्या वाढदिवसाच्या पार्टीत देखील वेदांग आणि खुशी सोबत दिसले होते. त्यांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांचे लक्ष वेधले. असं म्हटलं जातं की गेल्या वर्षभरापासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत, मात्र त्यांनी अद्याप त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.
ऑरीचा व्हिडीओ आणि चाहत्यांची प्रतिक्रिया
ऑरीने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वेदांगच्या चेहऱ्यावर लिपस्टिकचे डाग आहे आणि खुशी मजेत सांगते की तिने वेदांगला किस केले नाही. मात्र व्हिडीओच्या शेवटी कॅमेरा ऑरीकडे वळतो आणि त्याच्या ओठांवर लिपस्टिकचे डाग दिसतात. त्यामुळे हे फक्त मजा होती की यात काहीतरी खरेपणाही आहे, यावर आता चर्चेला नवे फाटे फुटले आहेत. यावर चाहत्यांनी देखील मजेत अनेक कमेंट्स केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'आम्हाला माहित आहे, हे ऑरीने नाही तर खुशीनेच केले आहे.' तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहीले, 'आता तरी काही लपवू नका.'
वेदांगचा खास वाढदिवस आणि खुशीची उपस्थिती
2 जून रोजी लंडनमध्ये वेदांगचा 25 वा वाढदिवस साजरा झाला. करिमा बॅरीने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये खुशी आणि वेदांग ब्लॅक आऊटफिटमध्ये ट्विनिंग करताना दिसले. केक कापताना खुशी त्याच्याजवळ उभी असून त्याच्याकडे प्रेमाने पाहताना दिसते- या फोटोंमधील तिचं हास्य आणि टाळ्या खूप काही सांगून जात आहेत.
हे ही वाचा: 'हाऊसफुल 5' मधील कलाकारांचं मानधन किती? अक्षयपासून सोनमपर्यंत कोणी किती घेतली फी जाणून घ्या
खुशीची प्रतिक्रिया - काम महत्त्वाचं, आयुष्य खाजगीच राहो
एका जुन्या मुलाखतीत खुशीने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल स्पष्ट मत व्यक्त केले होते. तिने सांगितले की, हे तिच्यासाठी नवं आहे आणि ती अशा गोष्टींवर फारसं लक्ष देत नाही. लोकांनी तिच्या कामावर लक्ष द्यावं, असं तिला वाटतं आणि वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवणंच तिला अधिक योग्य वाटतं.
चाहत्यांना वाट पाहणं सुरूच...
सध्या सोशल मीडियावर या दोघांबाबत प्रचंड चर्चा सुरू आहे. मात्र खुशी आणि वेदांग अजूनही यावर मौन बाळगत आहेत. त्यांच्या अनेक फोटो आणि व्हिडीओ हे नातं स्पष्टपणे सूचित करतात. मात्र, अधिकृत घोषणेचीच सर्वांना प्रतीक्षा आहे. येत्या काळात हे दोघं स्वतःहून काही सांगतात का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.