Konkan Hearted Girl Ankita Walawalkar : आज गुरुपौर्णिमा त्यानिमित्तानं आपण सगळेच आपल्या गुरुंची आठवण काढतो. त्यांना फोन करून, मेसेज करून किंवा मग त्यांना प्रत्यक्षात भेटून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. पण याच दिवशी जर आपल्याला आपल्या गुरुंविषयी एखादी दु:खद बातमी कळाली तर, आपल्या पाया खालची जमिन हादरेल तसं काहीसं आता सगळ्यांची लाडकी कोकणहार्टेड गर्लसोबत झालं आहे. अंकिताला आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी कळलं की एक वर्षापूर्वी तिच्या सरांनी आत्महत्या केली. यानिमित्तानं अंकितानं सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
अंकितानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं तिच्या सरांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अंकितानं कॅप्शन दिलं की 'एका वर्षाने समजलं... की आमचे सक्नु सर आपल्यात नाहीत. त्यांनी आत्महत्या केली. मनावर मोठा आघात झाला, कारण आठवणही तेव्हा आली... जेव्हा ती व्यक्ती कायमची हरवली. आपण आयुष्यात इतके व्यस्त होतो की शिक्षकांचं अस्तित्व फक्त गुरुपौर्णिमेपुरतं मर्यादित झालंय. त्यांचं माणूसपण, त्यांची वेदना, त्यांचा संघर्ष... आपण लक्षात घेतलाच नाही. आज मन सुन्न आहे. त्या हसऱ्या चेहऱ्यामागे काय दुःख दडलेलं होतं, आपल्यापैकी कुणालाच कळलं नाही... की कळवून घेतलं नाही? आपण वेळेत एक फोन केला असता, एक भेट दिली असती, तर कदाचित आजचा दिवस वेगळा असता. सर, तुमचं शिकवणं, तुमचा आवाज, तुमचं प्रोत्साहन... अजूनही मनात जपून ठेवलंय. माफ करा सर... उशिरा आठवण काढली पण मनापासून. तुमच्या आत्म्यास शांती लाभो.'
अंकितानं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र, यातून एक गोष्ट लक्षात आल्याचं चाहते म्हणत आहेत की आजकाल आपण सगळेच आपल्या आयुष्यात इतके गुंग झालो आहोत की आपल्याला इतरांविषयी काही माहित नसतं. टेकनॉलॉजीनं आपल्याला जवळ आणलं असलं तरी आपण टेकनॉलॉजीमुळे इतरांपासून लांब होतोय. अशात तब्बल एका वर्षानं अंकिताला तिच्या शिक्षकाच्या निधनाविषयी कळलं.