Guess The Movie: बॉलिवूडच्या इतिहासात ब्लॉकबस्टर चित्रपटांचा उल्लेख झाला की सर्वप्रथम नाव घेतलं जातं ते 'शोले'चं. 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांवर जादू केली होती. दमदार कथा, संस्मरणीय संवाद, अप्रतिम गाणी आणि जय-वीरू, गब्बर यांसारखी अविस्मरणीय पात्रं यामुळे 'शोले'नं केवळ बॉक्स ऑफिसवर विक्रम केला नाही, तर पुढच्या अनेक दशकांपर्यंत भारतीय सिनेमाचा चेहरा बदलून टाकला.
मात्र, फार कमी लोकांना माहिती आहे की सहा वर्षांनंतर, 1981 मध्ये आलेल्या 'क्रांती'ने 'शोले'च्या विक्रमाला आव्हान दिलं. मनोज कुमार दिग्दर्शित हा देशभक्तीपर चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालू लागला. त्या काळात इतक्या भव्य प्रमाणावर देशभक्तीवर आधारित चित्रपट येणं ही दुर्मिळ गोष्ट होती.
'क्रांती'मध्ये दिलीप कुमार, शशी कपूर, मनोज कुमार, हेमा मालिनी आणि परवीन बॉबी यांसारखे सुपरस्टार्स होते. ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्याची कहाणी, दमदार देशभक्तीपर संवाद आणि भव्य सेट्समुळे प्रेक्षक चित्रपट थिएटरमध्ये पाहण्यास उत्सुक दिसले. या चित्रपटाने देशभक्तीची लाट पुन्हा एकदा जागवली.
त्या काळातील सर्वात मोठं बजेट मानला जाणारा 3 कोटींमध्ये बनलेला 'क्रांती' चित्रपट प्रदर्शनानंतर तब्बल 16 कोटींची कमाई करत प्रचंड यशस्वी ठरला. उत्तर भारतात या चित्रपटाने विक्रमी कमाई केली आणि अनेक ठिकाणी 50 ते 90 आठवड्यांपर्यंत सलग चालत जयंती साजऱ्या केल्या. या चित्रपटामुळे दिलीप कुमार यांनी बॉलिवूडमध्ये भव्य पुनरागमन केलं. अनेक वर्षांनंतर त्यांचे असे मेगा-बजेट चित्रपटात पुनरागमन होत असल्याने प्रेक्षकांसह समीक्षकांचंही लक्ष त्यांच्यावर खिळलं होतं. त्यांच्या भूमिकेने या चित्रपटाचं मुख्य आकर्षण अधिक गडद केलं.
हे ही वाचा: 'कट, कट, कट!' रोमान्स करताना 'या' अभिनेत्रींसोबत को-स्टार्सचा सुटला ताबा; सेटवर राहिले नव्हते भान
आजही 'शोले' आणि 'क्रांती' हे चित्रपट क्लासिक ब्लॉकबस्टर्स म्हणून ओळखले जातात. एकाने ॲक्शन आणि मैत्रीच्या कथानकाने प्रेक्षक जिंकले, तर दुसऱ्याने देशभक्तीच्या भावनांनी. हे दोन्ही चित्रपट दाखवून देतात की योग्य आशय, स्टार पॉवर आणि संगीत यांचा संगम बॉक्स ऑफिसवर किती मोठा चमत्कार घडवू शकतो.
चित्रपटांच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर शोले चित्रपटाने 35 कोटींची कमाई केली. तर क्रांतीने 16 कोटींची कमाई करत चाहत्यांची मने जिंकली, या चित्रपटाने केवळ आर्थिक यश मिळवले नाही तर प्रेक्षकांच्या हृदयातही आपले स्थान निर्माण केले.