मुंबई : एकनाथ शिंदे यांनी उललेलं पाऊल सत्ताधाऱ्यांना मोठा हादरा देऊन गेलं. त्यांना मिळालेल्या आमदारांच्या समर्थनामुळं बहुमतात असणारं सरकार अल्पमतात आलं आणि राज्यात सत्तापालट होण्याच्या हालचालींना वेग आला. शिवसेना आणि पक्षश्रेष्ठींशी असणारे मतभेद पाहता त्यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितलं गेलं. (maharashtra shivsena eknath shinde mns leader amey khopkar slams cm uddhav thackeray over dharmaveer movie)
आता मनसेनंही या वादात उडी घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासाठी गुरुस्थानी असणाऱ्या आनंद दिघे यांच्या जीवनावर बेतलेल्या 'धर्मवीर' या चित्रपटाचा संदर्भ मनसेकडून देण्यात आला.
मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी नुकतेच ट्विटरवर दोन व्हिडीओ शेअर केले. या व्हिडीओंमध्ये चित्रपटातील आणि आनंद दिघे यांच्या आयुष्यातील अखेरचे क्षण दाखवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.
दिघे साहेब रुग्णालयात असतेवेळी जेव्हा राज ठाकरे त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते तेव्हाचेच हे क्षण. इथेच आनंद दिघे साकारत असणाऱ्या प्रसाद ओक यानं म्हटलेल्या डायलॉगला शिवसेनेच्या सांगण्यावरून कात्री मारण्यात आल्याचा आरोप खोपकर यांनी केला.
'दृश्यामध्ये दिघे साहेब (प्रसाद ओक) राज ठाकरेंना म्हणताना दिसतात की, संपूर्ण हिंदुत्त्वाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर, मातोश्रीवरच्या लोकांना हे बघवलं नाही. हीच वादाची ठिणगी असावी. कारण, ओटीटी प्लॅटफॉर्मवरून त्यांनी हा डायलॉग काढायला लावला', असं म्हणत खोपकर यांनी माध्यमांशी संवाद साधत संताप व्यक्त केला. +++
खालील दोन्ही व्हिडीओ काळजीपूर्वक बघा.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) June 28, 2022
‘धर्मवीर’जेव्हा zee5 वर येतो तेव्हा राजसाहेबांबद्दलचं वाक्य का गायब होतं? ही उद्धव ठाकरेंची सेन्सॉरशिप नाही तर दुसरं काय?राजसाहेबांच्या लोकप्रियतेला टरकणाऱ्या शिवसेनेचा खरा चेहरा उघड झालाय. pic.twitter.com/9fuL93LVCm
‘धर्मवीर’ आनंद दिघे यांचा आवाज दाबणाऱ्या वृत्तीचा कडक शब्दात निषेध. pic.twitter.com/STYsekKnXg
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) June 28, 2022
मला शिवसेनेच्या लोकांची किव करावीशी वाटते असं म्हणत त्यांनी जळजळीत टिकाही केली. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना न विचारताच चित्रपटातील संवाद बदलल्याचा गंभीर आरोप त्यांनी शिवसेना आणि पक्षश्रेष्टींवर केला.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'धर्मवीर'च्या खास स्क्रीनिंगच्या वेळी नेमका अखेरच्याच काही मिनिटांमध्ये चित्रपट अर्ध्यावर सोडत ते त्या ठिकाणहून निघाले होते, तिच वादाची ठिणगी होती, असं थेट वक्तव्यही त्यांनी केलं.