Ashok Saraf: अभिनेते अशोक सराफ हे मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध कलाकार आहेत. त्यांना काही दिवसांपूर्वीच पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. त्यांना सर्वजण लाडके मामा म्हणून ओळखतात. कित्येक वर्षांपासून अशोक सराफ हे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आले आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडायचा. फक्त मराठीच नाही तर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत देखील आपले नाव कमावले. मात्र, त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी भूमिका मिळायची.
दरम्यान, अशातच अशोक सराफ यांनी 'अमुक तमुक' या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत फक्त दुय्यम भूमिका मिळायच्या. अशोक सराफ यांनी 'प्यार किया तो डरना क्या', 'गुप्त', 'जोरु का गुलाम', 'सिंघम', 'करण अर्जुन' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, अशोक सराफ यांना कधीच हिंदी चित्रपटसृष्टीत हिरोची भूमिका मिळाली नसल्याचं अशोक सराफ यांनी म्हटलं.
हिंदी सिनेसृष्टीत काम मिळाला नाही हिरोचा रोल
पुढे अशोक सराफ म्हणाले, मराठी लोकांची इमेज ही बॉलिवूडमध्ये बसत नाही. कारण त्यांच्या मते चित्रपटांमधील हिरो गोरा पान असावा. त्यामुळे तो गोरा असेल तर तो काय काम करतो हे कोणाला माहित नसतं. पण आपण गोरे नसल्यामुळे आम्हाला कधीच हिरोचा रोल मिळाला नाही. मला आणि लक्ष्मीकांतला हिंदीमध्ये नोकराची भूमिका मिळायची. त्यामुळे तेव्हा ते करायचं की नाही ते आम्हाला ठरवाव लागत होतं. पैसे चांगले देत असतील तर ते करण्यासाठी काहीच हरकत नव्हती.
भोजपुरीमधील बेस्ट अॅक्टर अवॉर्ड
पण लोकांना नोकरामध्ये काही अर्थ नाही. त्यांना हिरोच आवडतो. त्यामुळे आम्हाला तिथे हिरो म्हणून काम मिळत नव्हतं. त्यामुळे आम्ही कधी हट्ट करत नव्हतो. मला जेव्हा वेळ असेल तेव्हाच फक्त मी काम केलं. त्यावेळी एक भोजपुरी प्रोड्यूसर देखील माझ्याकडे आला होता. पण मी त्याला माझ्याकडे वेळ नाही म्हटलं. पण मी म्हणालो की पुढच्या 15 दिवसांमध्ये जमत असेल तर बघा. तो म्हणाला चालेल. त्यावेळी मी त्यांची भाषा परफेक्ट बोललो. मला त्या वर्षीच भोजपुरी बेस्ट अॅक्टर अवॉर्ड मिळालं. जी माझी भाषा नाही त्या भाषेत मला अवॉर्ड मिळालं असं त्यांनी सांगितलं.