Marathi Actor Tushar Ghadigaonkar Suicide : मराठमोळा अभिनेता आणि लेखक तुषार घाडीगांवकरनं आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्याच्या बातमीनं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. तुषारनं चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं होतं. तर काही दिवसांपासून तुषार हा मानसिक तणावातून जात असल्याचं म्हटलं जात आहे. त्याला कंटाळूनच त्यानं आत्महत्या करण्याचं पाऊल उचलल्याची माहिती मिळाली आहे. तर त्याच्या निधनानं अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. तुषारच्या निधनाची बातमी अभिनेका अंकुर वाढवेनेनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली. त्यानं तुषारच्या निधनानं धक्का बसल्याचं सांगत दु:ख व्यक्त केलं आहे.
अंकुर वाढवेनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अंकुरनं तुषारचा एक फोटो शेअर करत कॅप्शन दिलं की 'मित्रा का? कशासाठी? कामं येतात जातात, आपण मार्ग काढले पाहिजे पण आत्महत्या हा मार्ग नाही! मान्य आहे सध्याची परिस्थिती विचित्र आहे पण हा निर्णय नाही होऊ शकत. तुषार घाडीगांवकर तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो,'
तुषारच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तो मुळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील आहे. तुषारनं नाटकातून अभियन क्षेत्रात पदार्पण केलं. तर मुंबईतील रुपारेल कॉलेजमधील नाट्य विभागात तो सक्रिय होता. कॉलेजनंतर मालिका, चित्रपट अशा वेगवेगळ्या मनोरंजनाच्या क्षेत्रातून त्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. दरम्यान, त्यानं इतकं मोठं पाऊल उचलल्यानं कलाकार हे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत काम मिळत नाही म्हणून इतकं मोठं पाऊल नाही उचलायचं, असं बोलताना दिसत आहेत. तर अनेकांनी इतका मोठा निर्णय का घेतलास असा सवाल करत त्यांचं दु:ख व्यक्त करत आहेत.
हेही वाचा : जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत संजय कपूर, करिश्माच्या Ex नवऱ्याचा अखेरचा VIDEO समोर!
तुषार हा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक म्हणून प्रसिद्ध होता. त्यानं 'लवंगी मिरची', 'मन कस्तुरी रे', 'भाऊबळी', 'उनाड', 'झोंबिवली', 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे', 'संगीत बिबट आख्यान' यासारख्या अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं. त्यानं प्रत्येक क्षेत्रातून प्रेक्षकांच्या मनात स्वत: ची एक छाप सोडली. नुकतंच सन मराठी या वाहिनीवर सुरु असलेल्या माझा पांडुरंग या मालिकेत देखील तो दिसला.