Actress Sonalee Kulkarni On Saie Tamhankar: मराठी मनोरंजनसृष्टीमधील आघीडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या सोनाली कुलकर्णीने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. याच निमित्ताने सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. या व्हिडीओमध्ये सोनाली तिच्या आवडत्या खाद्यपदार्थांबद्दल, खाण्या-पिण्याच्या सवयींबद्दल बोलताना दिसत आहे. मात्र या मुलाखतीमधील एका प्रश्नाला उत्तर देताना सोनालीने, 'सई ताम्हणकरकडे जेवायला कधीच जाणार नाही,' असं म्हणत एक किस्सा सांगितला आहे. नेमकं सोनालीबरोबर असं काय घडलं होतं की ती आता सईच्या घरी कधीच जेवायला जाणार नाही असं म्हणतेय ते पाहूयात...
सोनाली कुलकर्णीने 'राजश्री मराठी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींबद्दल भाष्य केलं आहे. खाण्यासंदर्भात आपली कोणतीही नाटकं नसतात असं सोनालीने या मुलाखतीत सांगितलं. तसेच पुढे बोलताना तिने एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये नवऱ्याबरोबरच म्हणजेच कुणालबरोबर खाण्यासाठी बाहेर जाते तेव्हा पिझ्झा हा त्यांच्या ऑर्डरमध्ये असतो असं सांगितलं. यामागील कारण देताना तिने कुणाल आणि मी पहिल्यांदा पिझ्झा डेटवर भेटल्याने आम्ही बाहेर खायला जातो तेव्हा पिझ्झा ऑर्डर करतोच, असं सांगितलं. अचानक घरी पाहुणे आले तर आपण त्यांना वरण-भात करुन जेवायला घालू असंही सोनालीने या मुलाखतीमधील एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं आहे. वरण-भात लवकर होतो आणि तो एकदा कुकरला लावल्यानंतर पाहुण्यांबरोबर गप्पा मारायला वेळ मिळेल असं या उत्तरामागील लॉजिक सोनालीने सांगितलं.
इंडस्ट्रीमधील अशा दोन व्यक्ती ज्यांच्याकडे तू कधीही जेवायला जाऊ शकते? असा प्रश्न मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला असता सोनालीने पाहिलं नाव नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकरचं घेतलं. त्यानंतर दुसऱ्या नावाबद्दल विचार करत असतानाच सोनालीला मुलाखत घेणाऱ्या अँकरनेच सई? असं विचारलं असताना सोनालीने अगदी कपाळाला हात लावत, 'या सईकडे तर आम्ही कधीच जेवायला जाणार नाही,' असं म्हटलं. पुढे बोलताना सोनालीने सईने घरी जेवायला बोलावलं होतं तेव्हा काय घडलेलं याचा संपूर्ण घटनाक्रमच सांगितला. "तिने मला आणि कुणालला जेवायला बोलावलं होतं. तिने आम्हाला लंचला (दुपारच्या जेवणाला) बोलावलं होतं आणि डिनरला वाढलं जेवायला," असं सोनालीने सांगितलं. म्हणजेच दुपारच्या जेवणाला बोलावून रात्री सईने आम्हाला खाऊ घातलं असं सोनालीने सांगितलं. "आम्ही दोघं पार मेलो होतो. सई ताम्हणकरकडे कधी जेवायला जाणार नाही. तिचा पास्ता होतोचय, होतोचय असं झालेलं," असंही सोनाली म्हणाली.
तसेच, "आम्ही दुपारी लंचला जाणार होतो. सई म्हणाली होती, काही खाऊन-पिऊन येऊ नका हा, मी मस्त जेवण करणार आहे. भुकेने या, असं तिने सांगितलं होतं. म्हणून मी कुणालला फोन करुन म्हटलं होतं, ब्रेकफास्ट खाऊ नकोस हा, तर तू विचार करु शकते की ब्रेकफास्ट नाही खाल्लाय, लंच नाही खाल्लाय, डायरेक्टली डीनर! त्यामुळे नो, सई ताम्हणकर इज नो!" असं सोनाली अगदी हातवारे करुन म्हणाली.
ज्या कलाकाराकडे कधीही जेवायला जाता येईल यासंदर्भातील प्रश्नावर दुसरं नाव घेताना सोनालीने प्रार्थना बेहरेच्या सासूबाई फार उत्तम जेवण बनवतात, असं सांगितलं.