Riteish Deshmukh got emotional : महाराष्ट्राच्या मातीत मोठा झालेला आणि मनानं मराठी बाणा जपत हिंदी कलाविश्व गाजवणारा अभिनेता रितेश देशमुख कायमच आपल्या वागण्याबोलण्यानं सर्वांची मनं जिंकतो. एक अभिनेता असण्यासोबतच रितेश एक व्यक्ती म्हणूनही अनेकांसाठीच जवळचा. अशा या अभिनेत्यावर बऱ्याच जबादबाऱ्यांचंही ओझं. एक कलाकार म्हणून वावरत असतानाच एक महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा, एक पती, एक वडील आणि एक भाऊ, अशा विविध भूमिका तो पार पाडत असतो.
हाच रितेश त्याच्यासोबत कायमच एक वलय घेऊन वावरत असतो. हिंदी आणि मराठी कलाजगतात अभिनयापासून निर्मितीपर्यंतच्या क्षेत्रात नाव उंचावणाऱ्या रितेशनं नुकत्याच पार पडलेल्या झी चित्र गौरव सोहळ्यात हजेरी लावली होती. यावेळी तो व्यासपीठावर येताच टाळ्यांचा कडकडाट झाला. तिथं अभिनेता जितेंद्र जोशी यानं त्याचं स्वागत केलं आणि एक पत्र वाचण्यास सुरुवात केली. हे पत्र या संपूर्ण कार्यक्रमाला एक भावनिक वळण देऊन गेलं.
जितेंद्र जोशी पत्र वाचत गेला आणि त्याचा प्रत्येक शब्द रितेश लक्षपूर्वक ऐकत होता. भावनांना आवर घालत होता. पण, अखेर भावनांचा बांध फुटला आणि रितेशच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. हे पत्र होतं खुद्द रितेशचे वडील आणि महाराष्ट्र राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं...
पत्रास कारण की...
''सप्रेम नमस्कार विनंती विशेष...
पत्रास कारण की, या पत्रास काहीही कारण नाही. बापाला मुलांशी बोलायचा कारणांची गरज कधीपासून भासायला लागली? आमचा दांडगा जनसंपर्क तर तुम्हाला माहितच आहे, तुमचा पहिला मराठी सिनेमा पाहताना आम्हाला खूप भरून आलं. तुमचा माऊली पाहताना तर अभिमान वाटला. तुमचं दिग्दर्शक म्हणून 'वेड' अनुभवलं आणि खात्री पटली, यापुढेही अशीच आनंदाची अनुभूती तुम्ही आम्हाला आणि प्रेक्षकांना देत राहाल.
'तुझे मेरी कसम'चा आमचा समज तुम्ही 'वेड'मध्ये खोटा ठरवाल असं वाटलं होतं पण, नाहीच. सुनबाई अजूनही तुम्हाला पुरून उरत आहेत. गंमत बाजूला पण, रितेश तुम्ही वयोमनानं आणि कर्तृत्त्वानं कितीही मोठे झालात तरी आम्हाला दिसतो तो भावंडांसोबत बाभळगावच्या विहिरीत पोहणारा, गुडघे फोडून सायकलची फेरी मारणारा, क्रिकेटची बॅट खांद्यावर घेतलेला आमचा लहानगा...
आता तुम्ही अवघ्या भारताचं दैवत, आमची प्रेरणा राजाधिराज छत्रपती शिवरायांवर चित्रपट घेऊन येत आहात. परवाच्या तुमच्या लूक टेस्टला आम्ही तुम्हाला डोळे भरून पाहिलं आणि डोळे भरून आले....''
झी चित्र गौरवच्या या सोहळ्यात रितेशचे आणि इतर कलाकारांचेही खास क्षण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, हा सोहळा त्यांना अनुभवता येणार आहे.