Marathi Celebrity on Vaishnavi Hagavne Suicide Case : वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणेला अटक केली आहे. त्याचसोबत वैष्णवीचा दीर सुशीललाही अटक करण्यात आली आहे. वैष्णवीनं सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आलं. वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांनाही आधीच अटक झालीय. वैष्णवीनं 16 मे 2025 रोजी गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणावर संपूर्ण राज्यभरातून संतापाची लाट पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. तर मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडेनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचा संताप व्यक्त केला आहे.
अश्विनीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत ती म्हणाली की 'ही माणसं शिकलेली, पैशानं श्रीमंत असली तरीही मानसिकता... सुनेला मारहाण करून, दरवेळी माहेरकडून काहीना काही आणायला सांगणं ही क्रूर बाब आहे आणि आरोपींना योग्य ती शिक्षा व्हायला हवी. आता जर हे प्रकरण दाबले, तर पुन्हा एकदा पैसे आणि पद यांचा विजय होईल आणि न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. यावर आताच वचक बसणे गरजेचे आहे.'
अश्विनीनं फक्त ही स्टोरीव शेअर केली नाही तर त्यासोबत तिनं या पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग केलं आहे. तर यासोबत तिनं 'आपलीच लाडकी बहीण, या घटनेचा जाहीर निषेध' असं देखील म्हटलं आहे.
हेही वाचा : 8599 कोटींचा मालक... अवघ्या 13 वर्षात 'तो' झाला जगातील सर्वात श्रीमंत युट्यूबर; थक्क करणारा प्रवास
अश्विनीसोबत अभिनेता सुव्रत जोशीनं देखील त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर त्यानं शेअर केलेल्या या पोस्टचा संबंध हा वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येशी जोडण्यात येत आहे. ही पोस्ट शेअर करत त्यानं म्हटलं की 'गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात घडलेल्या घटनांमुळे आपण समाज म्हणून अजूनही किती मागास आहोत हे लख्ख होतं आहे... आपले आताचे खरे प्रश्न हे प्रबोधन आणि पर्यावरण याच्याशी निगडित आहेत... आपले प्रश्न धर्माशी निगडीत आहेत असं भासवणं हे मुद्दामहून दिशाभूल करण्याचं कारस्थान आहे... त्यातून समाजाच्या डोक्यावर बसलेले स्वतःचे स्थान अबाधित ठेवत आहेत फक्त...'