मराठी दिग्दर्शक केदार शिंदे स्वामी समर्थांचे भक्त आहेत. त्यांच्या चित्रपटातून, सोशल मीडियावरुन नेहमीच त्यांची ही बाजू पाहायला मिळत असते. दरम्यान आपल्या आयुष्यात स्वामी समर्थांचं नेमकं काय स्थान आहे हे केदार शिंदे यांनी सांगितलं आहे. एका वाक्यात सांगायचं तर स्वामी नसते तर मी मेलो असतो असं सांगत केदार शिंदे यांनी त्यांच्या जीवनातील स्वामीचं महत्त्व सांगितलं आहे. अपघाताने मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि त्यांनी मला जवळ करुन घेतलं असंही त्यांनी सांगितलं.
पॉडकास्टमध्ये सहभागी झालेल्या केदार शिंदे यांना स्वामींचं तुमच्या आयुष्यात काय स्थान आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, "माझ्या आयुष्यात स्वामींचा काही संबंधच नव्हता. आमच्या घराण्यात कोणी स्वामी समर्थांचं केलेलं नाही. 3 जुलै 1997 ला मी पहिल्यांदा फ्रेम पाहिली आणि वर लिहिलं होतं श्री स्वामी समर्थ. तेव्हा हे स्वामी समर्थ का असं माझं झालं. अपघाताने मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि त्यांनी मला जवळ घेतलं".
पुढे त्यांनी सांगितलं की, "मी जे मागतो ते देतात असं काही नाही. ते प्रचंड परीक्षा पाहतात. रसातळाला पोहोचताना तुला ते हात देतात. पण हात देताना जी शक्ती लावायची असते, ती आपल्यालाच लावायची असते. अलगद काढून तुला घेणार असं नाही".
"मी ज्या पद्धतीने काम केलं आहे, त्यात मला खूप त्रास झाले आहेत. मी खूप हारलो आहे. मी संपलो आहे. परत उठलो आहे. आपण वाईट काळात परमेश्वराचं नाव घेतो की देवा लक्ष ठेवा. पण जेव्हा चांगली वेळ येते तेव्हा अलगद दुर्लक्ष होतं. .मी त्यांच्यामुळे जगत आहे, नाहीतर मी मेलो असतो हेच मी सांगेन," असंही ते म्हणाले.