Ashok Saraf Birthday : मराठी रंगभूमी आणि मराठी सिनेजगतामध्ये भरीव योगदान देणाऱ्या कलाकारांच्या यादीत अतिशय आदरानं घेतलं जाणारं एक नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं. काही दिवसांपूर्वीच कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारनंही त्यांना 'पद्मश्री' पुरस्कार देत गौरवलं. अशा या प्रत्येक चाहत्याच्या हक्काच्या अभिनेत्याचा आज (4 जून 2025) 78 वा वाढदिवस. त्याच निमित्तानं चला भरभरून बोलूया या कमाल अभिनेत्याबद्दल...
अशोक सराफ... फक्त नाव नाही तर आजच्या जेन Z भाषेत सांगावं तर ही एक 'वाईब' आहे. 1947 मध्ये जन्मलेल्या या अभिनेत्यानं फक्त कलाविश्च गाजवलं असं नाही, तर तब्बल 10 वर्षं त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीसुद्धा केली. नोकरी सुरू असतानाच कलाक्षेत्र आणि रंगभूमीविषयीची आत्मियता काही त्यांच्यापासून दुरावली नव्हती. म्हणूनच त्यांनी कामासोबतच ही दुसरी इनिंगसुद्धा सुरूच ठेवली. सरतेशेवटी कलेवरील प्रेमाचं पारडं जड झालं आणि अशोक सराफ यांनी अभिनयातील कारकिर्दीत स्वत:ला वाहून घेतलं.
आजवर अशोक सराफ यांनी अनेक भूमिका, पात्र गाजवली. पण, त्यांचा पहिला चित्रपट माहितीय? 1969 मध्ये त्यांनी जानकी या मराठी चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण केलं. पण, खऱ्या अर्थानं हे नाव घराघरात पोहोचवलं ते म्हणजे 1975 च्या 'पांडू हवालदार'नं.
नाटक, सिनेमा आणि मालिका अशा सर्वच माध्यमांतून ते प्रेक्षकांच्या भेटीला येऊ लागले. 'धुमधडाका' या चित्रपटात त्यांनी साकारलेले 'नवकोटनारायण उद्योगभूषण यदुनाथ जवळकर' असो किंवा मग 'कॅप्टन रणगाडे' असो. आपल्या वाट्याला आलेलं पात्र प्रेक्षक कधीच विसरु शकणार नाहीत याची खात्रीच जणू ते दिग्दर्शकांना करून देत, किंबहुना आजही देतात.
फक्त मराठीच नव्हे, तर हिंदी सिनेविश्वात 'खुबसूरत', 'कोयला', 'करण अर्जुन', 'येस बॉस' आणि 'सिंघम' या आणि अशा इतरही चित्रपटांतून ते झळकले. 'मला राजकारण कळत नाही, मी एक साधा माणूस आहे...' असं म्हणत अशोक सराफ यांनी काही मुलाखतींमध्ये अगदी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आणि त्यांच्या या सच्चेपणानंच प्रेक्षकांच्या मनाता सतत ठाव घेतला.
1988 मध्ये अशोक सराफ यांच्या मानेला मोठा झटका बसल्यानं त्यांना सहा महिने विश्रांती करावी लागली होती. यानंतर 2012 मध्येसुद्धा त्यांनी आणखी एका अपघाताचा सामना केला, जिथं नशीब बलवत्तर म्हणून काहीच अनुचित घडलं नाही. 2012 मध्ये मुंबई पुणे एक्स्प्रेसवरे इथं तळेगाव बोगदा ओलांडताना अशोक सराफ, संतोष जुवेकर, संगीतकार सतीश चंद्र असणाऱ्या कारच्या मागचा टायर फुटून एक अपघात झाला होता. संकट मोठं होतं मात्र नियतीनं अशोक सराफ यांचीच साथ दिली.
चाहत्यांचं प्रेम, त्यांचे आशीर्वाद आणि कलेप्रतीची समर्पकता यांच्या बळावर मोठ्या झालेल्या या कलाकाराला यापुढंही असंच प्रेम मिळत राहो, अशाच शुभेच्छा चाहते देत आहेत.