मराठमोळा अभिनेता अभिजीत केळकर त्याने केलेल्या भूमिकांमधून ओळखला जातो. पण सध्या त्याची चर्चा होतेय ती त्याने केलेल्या कृतीमुळे. अभिनेता अभिजीत केळकर आतापर्यंत आपल्याला वेगवेगळ्या मालिका आणि सिनेमांमध्ये दिसला आहे. अभिजीत केळकर नुकत्याच केलेल्या भूमिकांमुळे चर्चेत होता. ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत त्याने साकारलेली साहेबरावची भूमिका आणि ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील केदारची भूमिका चांगलीच गाजली. पण आता अभिजीतचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्याचा खरेपण दिसला आहे.
बाप-लेकीचं नातं कायम अधोरेखित केलं जातं. पण या नात्यातील खास गोष्टी समोर येतात तेव्हा ते आणखी बहरताना दिसतं. या व्हिडीओत अभिजीत केळकर आपल्या मुलीच्या वेण्या बांधताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे अभिजीत इतक्या सराईतपणे आणि सहज वेण्या घालत आहे की, हे त्याच्या अंगवळणीचं काम दिसत आहे.
"आई ऑफिसला जाते तेव्हा आम्ही...' अशी कॅप्शन देत अभिजीतने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याची लेक राधी हिचे केस विंचरताना दिसत आहे. या व्हिडीओखाली अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये अनेकांनी अभिजीतच्या या कृतीचं कौतुक केलं आहे. तर काहींनी बाप असावा तर असा अशी प्रतिक्रिया दिली आहे.
अभिजीत केळकर अनेकदा मुलगा मल्हार आणि मुलगी राधाचे फोटो पोस्ट करत असतो. यामधून तो मुलांना जे संस्कार देतो ते खूप महत्त्वाचे वाटतात. आदर्श पालक आणि खास करुन आदर्श बाबाची भूमिका तो मांडत असतो. आता केलेल्या कृतीतूनही त्याने आईचे काम किंवा बाबाचे काम असं न मांडता पालक म्हणून ही दोघांची जबाबदारी हे अधोरेखित केलं आहे. अनेकदा पालक आपल्या कृतीतून मुलांसमोर आदर्श ठेवत असतात.
जसे की, मुलांची तयारी करणे त्यांचे केस विंचरणे किंवा त्यांच्याशी निगडीत सगळ्या गोष्टी या फक्त आईच बघणार किंवा करणार. पण असं नाही पालक म्हणून ही दोघांची जबाबदारी आहे. तसेच बाबा आपल्या मुलीसाठी कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यासाठी तयार असतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे.