Marathi News> मनोरंजन
Advertisement

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना मोहन जोशींच 'हे' आवाहन

मी रायगडचा आहे.... म्हणत बोलले मोहन जोशी 

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना मोहन जोशींच 'हे' आवाहन

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी सरकारने अनेक नियम आखून दिले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात कोरोनाचा संसर्गाचा फैलाव होऊन सर्वांना त्रास होऊ नये या पार्श्वभूमीवर सरकारने काही निर्णय घेतले आहेत. या नियमांचे पालन करण्याचे आवाहन अभिनेता मोहन जोशी यांनी केले आहे. 

'मी सुद्धा रायगडचा रहिवासी आहे. त्यामुळे मला कोकणाची काळजी वाटते. सध्या कोकणात कोरोनाचा एवढा प्रादुर्भाव नाही. कोकणातील लोकं काळजी घेत असल्याने इथे कोरोना नियंत्रणात आहे. पण गणेशोत्सवात हा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आपण खबरदारी घेण्याची गरज आहे. सरकारने दिलेल्या सूचनांचं पालन करा. येताना कोरोनाची चाचणी करून घ्या आणि कोरोना नसल्याचं प्रमाणपत्र घेऊनच सोबत या.', असं आवाहन मोहन जोशी यांनी केलं आहे. 

कोकणात गेल्यावर चाकरमान्यांनी सर्व सूचनांच पालन करायला हवं. तसेच सोशल डिस्टन्सिंगसह शासनाने दिलेले सर्व नियम पाळायले हवेत. तसेच या काळात प्रादुर्भाव वाढू द्यायचा नसेल तर आपल्याला सर्व नियम पाळायला हवेत असे मोहन जोशी यांनी म्हटलं. 

गणेशोत्सवानिमित्त गावी येणाऱ्या चाकरमान्यांना आता १४ दिवस क्वारंटाईन रहावं लागणार आहे. १४ दिवसांचा हा कालावधी पूर्ण करणं प्रत्येकासाठी बंधनकारक असणार आहे. अन्यथा चाकरमान्यांना खारेपाटण बाजारपेठेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. 

कणकवली तालुक्यातल्या खारेपाटणमध्ये राजापूर, कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातल्या सरपंचांची आज एक बैठक झाली. यावेळी चारही तालुक्यातल्या २५ ते ३० गावांचे सरपंच या बैठकीला हजर होते. या बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.  खरंतर आता गणेशोत्सवाची लगबग घरोघरी सुरू होते. पण सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळ आणि त्यामध्ये दररोज याबाबत वेगवेगळे निर्णय येत आहेत, त्यामध्ये या निर्णयाची भर पडली आहे. 

Read More