Kangana Ranaut On Her MP Salary: बॉलिवूडची ‘क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी कंगना रणौतने तिच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिने अभिनयाद्वारे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. अभिनयाचे कौशल्य दाखवल्यानंतर कंगना रणौत राजकारणात उतरली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ती हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर खासदार झाली. मात्र, सध्या कंगनाला राजकारणात फारसा आनंद वाटत नाहीये. काही दिवसांपूर्वी कंगना तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली होती. आता ती आपल्या सरकारी पगारामुळे नाराज असल्याचं समोर आलं आहे.
कंगना सरकारी पगारावर नाराज
‘टाइम्स नाऊ’ ला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने खासदार म्हणून मिळणाऱ्या पगारावर भाष्य केलं आहे. कंगना म्हणाली, मी नेहमी म्हणते की राजकारण हे खूप महागडा शौक आहे. जेव्हा तिला 'शौक' हा शब्द वापरल्याबद्दल विचारलं, तेव्हा ती म्हणाली, अगदी स्पष्ट आहे की जर तुम्ही खासदार आहात तर तुम्ही याला व्यवसाय म्हणून काम करू शकत नाही. कारण तुम्हाला नोकरीची गरज असते अर्थातच जर तुम्ही प्रामाणिक व्यक्ती असाल तर.
इथे तुम्हाला तुमचा स्वयंपाकी आणि ड्रायव्हर ठेवण्यासाठी जो पगार मिळतो त्यात शेवटी फक्त 50-60- हजार रुपये उरतात. हीच खासदार म्हणून तुमची प्रत्यक्षात मिळणारी रक्कम आहे. सध्या भारतात खासदारांना सुमारे 1.24 लाख रुपये पगार मिळतो.
जवळपास निम्मा खर्च खिशातून करावा लागतो
कंगना पुढे म्हणाली की, जर मला माझ्या मतदारसंघातील कुठल्याही भागात जावं लागलं आणि सोबत काही स्टाफसह गाडीतून प्रवास करावा लागला तर तो खर्च लाखोंमध्ये जातो. कारण प्रत्येक ठिकाण हे किमान 300 ते 400 किमी दूर असतं. त्यामुळे हे एक खूप महागडा शौक आहे. तुम्हाला नोकरी असायलाच हवी. अनेक खासदार स्वतःचा व्यवसाय करतात. कोणी वकील म्हणून काम करतो. जसे की जावेद अख्तरसाहेब. तेही राज्यसभेत होते आणि त्यांचे काम सुरूच होतं. जावेद अख्तर 2010 ते 2016 दरम्यान राज्यसभा खासदार होते. त्यांची नियुक्ती तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी कला क्षेत्रातल्या योगदानासाठी केली होती.
'राजकारणात आता आनंद राहिला नाही'
याआधी देखील कंगनाने तिला राजकारणात आनंद होत नससल्याचं म्हटलं होतं. कारण लोक तिच्याकडे तुटलेल्या नाले आणि रस्त्यांच्या तक्रारी घेऊन जातात. कंगनाने म्हटलं की, समाजसेवा करणं तिचं पार्श्वभूमीचं काम नाही.