Mrunmayee Deshpande's Birthday Special: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आज तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनयाच्या माध्यमातून तिने छोट्या पडद्यावर आणि रुपेरी पडद्यावर आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. 'नटसम्राट', 'कट्यार काळजात घुसली' आणि 'स्लॅमबुक' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिच्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. 'अग्निहोत्र' आणि 'कुंकू' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधूनही ती घराघरांत पोहोचली. ती केवळ अभिनेत्रीच नाही, तर एक यशस्वी सूत्रसंचालिका आणि दिग्दर्शिका म्हणूनही नावारूपाला आली आहे.
तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी, विशेषतः तिच्या लग्नाशी संबंधित एक गोड आणि खास गोष्ट जाणून घेऊयात, जी एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखीच वाटते.
मृण्मयी आणि स्वप्नील राव यांचं लग्न 3 डिसेंबर 2016 रोजी पार पडलं. स्वप्नील एक यशस्वी व्यावसायिक आहे. त्या दोघांचं लग्न अरेंज्ड असूनही त्यांच्यातील नातं हे प्रेमविवाहाइतकंच घट्ट आणि जिव्हाळ्याचं आहे. त्यांच्या या बंधनाची सुरुवात झाली ती एका अनोख्या संयोगामुळे- जेव्हा स्वप्नीलचे वडील मृण्मयीला पहिल्यांदा पाहिले.
स्वप्नीलचे वडील मृण्मयीच्या सौंदर्याने, तिच्या सुसंस्कृत वागणुकीने आणि वैयक्तिक गुणांनी इतके प्रभावित झाले की त्यांनी स्पष्टपणे स्वप्नीलला सांगितलं, 'हीच आपली सून व्हायला हवी.' त्यांच्या मते मृण्मयी होती 'एक स्वप्नातील सून'. त्यांनी स्वप्नीलला तिला एकदा भेटायला सांगितलं.
हे ही वाचा: 'मी आणि माझं घर 10 वर्ष...'; प्राजक्ता माळीने शेअर केले मुंबईतील घराचे खास फोटो
स्वप्नीलने वडिलांच्या इच्छेचा मान ठेवत मृण्मयीशी संपर्क साधला. दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले आणि संवाद सुरू केला. काही दिवस फोनवर बोलल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष भेटायचं ठरवलं. पहिल्याच भेटीत दोघांच्याही आवडीनिवडी, स्वभाव आणि विचारसरणीत कमालीचं जुळणं झालं. त्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.
आज मृण्मयी आणि स्वप्नील ही जोडी केवळ वैयक्तिक आयुष्यातच नव्हे, तर सोशल मीडियावरही एक परिपूर्ण जोडपं म्हणून ओळखली जाते. ते एकत्र फोटो, व्हिडीओ आणि खास क्षण शेअर करत असतात. जे त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच प्रेरणादायक ठरतात.
मृण्मयीने एका मुलाखतीत सांगितले होते की स्वप्नील तिचा एक उत्तम मित्र, साथीदार आणि समजूतदार पती आहे. त्यांचा परस्पर विश्वास, सुसंवाद आणि प्रेम हे त्यांच्या नात्याचं खास वैशिष्ट्य आहे. या प्रेमळ जोडप्याची कहाणी आजही अनेकांना अरेंज्ड मॅरेजमध्येही आपुलकी, समजूतदारपणा आणि प्रेम असू शकतं याचं प्रेरणादायक उदाहरण म्हणून वाटते.