Neha Kakkar Birthday Special: नेहा कक्कर हे नाव आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिकांमध्ये घेतलं जातं. तिच्या आवाजाची जादू आणि चार्ममुळे तिने लाखोंच्या मनात घर केले आहे. नेहा आज तिचा 37वा वाढदिवस साजरी करत आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. अलीकडेच ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे नेहा कक्करचा एक लाईव्ह शो पार पडला, मात्र ती कार्यक्रमाला तब्बल 3 तास उशिरा पोहोचली. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. सोशल मीडियावर तिच्या या शोचे व्हिडीओ व्हायरल झाले, जिथे ती चाहत्यांची माफी मागताना दिसली.
नेहा कक्करची एकूण संपत्ती किती?
एका अहवालानुसार, नेहा कक्करची एकूण संपत्ती सध्या 104 कोटी रुपये आहे. ती दरमहा जवळपास 2 कोटी रुपयांहून अधिक कमावते. गाण्याबद्दल बोलायचं झालं, तर ती एका गाण्यासाठी 10 ते 20 लाख रुपये, तर कॉन्सर्टसाठी 25 ते 30 लाख रुपये मानधन घेत असते. तिच्या गायनाव्यतिरिक्त रिअॅलिटी शोमधील परिक्षक, म्युझिक व्हिडीओज, ब्रँड एंडोर्समेंट्स, यूट्यूब रिव्हेन्यू आणि सोशल मीडिया प्रमोशन्स यातूनही तिला प्रचंड उत्पन्न मिळते. एका रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून सहभागी होण्यासाठी ती 20 लाखांहून अधिक मानधन घेत असल्याचं सांगितलं जातं.
सोशल मीडियावर दबदबा
नेहा कक्कर इन्स्टाग्रामवर अत्यंत लोकप्रिय आहे. तिच्या प्रोफाईलवर 78.2 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. यामुळे ती एक इंफ्लुएंसर म्हणूनही बऱ्याच ब्रँड्ससाठी पसंतीची निवड आहे. इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवरून ती लाखोंची कमाई करते.
आलिशान घरं आणि लक्झरी कार कलेक्शन
वृत्तांनुसार, नेहा सध्या मुंबईच्या प्राइम लोकेशनमध्ये 1.2 कोटी रुपयांचा आलिशान फ्लॅट मध्ये राहते. याव्यतिरिक्त, तिचा ऋषिकेशमधील बंगला देखील सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे, जिथे ती वेळोवेळी आपले खासगी क्षण शेअर करत असते. नेहाकडे अनेक महागड्या लक्झरी गाड्यांचा संग्रह आहे. ज्यामध्ये Audi Q7, Mercedes-Benz GLS 350, BMW X6 यांसारख्या गाड्यांचा समावेश आहे.
हे ही वाचा: दीपिकाच्या अटी संपता संपेना; 'स्पिरिट' नंतर आता 'कल्की 2898 एडी' मधूनही बाहेरचा रस्ता?
नेहाच्या काही खास गोष्टी
नेहा कक्करने आपली कारकिर्द 'इंडियन आयडल' या रिअॅलिटी शोमधून सुरू केली होती, जिथे ती स्पर्धक होती. पुढे जाऊन ती त्याच शोमध्ये परिक्षक म्हणून परतली आणि तिचा प्रवास चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरला. तिचं 'काला चश्मा', 'सनी सनी', 'मिले हो तुम', 'ओ साकी साकी' यांसारखी गाणी आजही यूट्यूबवर प्रसिद्ध आहेत. नेहाने गायक रोहनप्रीत सिंग सोबत 2020 मध्ये लग्न केलं.
नेहा कक्कर ही केवळ एक गायिका नाही, तर एक ब्रँड आहे. तिची मेहनत, अष्टपैलूपणा आणि चाहत्यांशी प्रामाणिक नातं यामुळे ती आजच्या घडीला भारतातली सर्वात यशस्वी आणि श्रीमंत गायिकांपैकी एक बनली आहे.