Sonu Nigam Birthday Special: बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक सोनू निगम आज आपला 52 वा वाढदिवस साजरा करत आहेत. लहान वयातच त्याला गायनाची आवड लागली आणि केवळ चार वर्षांचा असतानाच त्याने वडिलांसोबत पहिल्यांदा स्टेजवर गाणं सादर केलं. 'क्या हुआ तेरा वादा' हे त्याचं पहिलं सार्वजनिक परफॉर्मन्स गाणं ठरलं. 19 वर्षांचा झाल्यावर सोनू मुंबईत आला आणि आपल्या करिअरची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्याला संघर्षाला सामोरं जावं लागलं - स्टेज शो, जिंगल्स, लग्न समारंभ अशा विविध ठिकाणी गाणी गाऊन त्याने आपला प्रवास सुरू ठेवला.
1990 साली त्याने पहिलं गाणं 'जनम' या चित्रपटासाठी रेकॉर्ड केलं, पण तो चित्रपट प्रदर्शितच झाला नाही. मात्र डीडी वरील 'तलाश' मालिकेतील गाण्यामुळे त्याला ओळख मिळाली. नंतर 'सा रे ग मा पा' शोमुळे ते घराघरात पोहोचला आणि पुढे 'इंडियन आयडल'च्या जज म्हणून त्याने अनेक नवोदित गायकांना मार्गदर्शन केलं. सोनू निगमने फक्त गायनच नाही तर अभिनय क्षेत्रातही हात आजमावला आहे. 'जानी दुश्मन' आणि 'लव्ह इन नेपाल' या चित्रपटांमध्ये तो झळकला, पण त्याच्या गाण्यांनीच त्याला खरी लोकप्रियता मिळवून दिली. हिंदीसह कन्नड, तमिळ, तेलुगू, ओडिया, बंगाली, मराठी आणि पंजाबी अशा 32 हून अधिक भाषांमध्ये त्याने 6000 पेक्षा जास्त गाणी रेकॉर्ड केली आहेत.
सोनू निगमने केलेला एक वेगळा प्रयोग आजही लोकांच्या लक्षात आहे - सोनूने भिकाऱ्याच्या वेषात रस्त्यावर गाणी गायली आणि आश्चर्य म्हणजे, कोणीही त्याला ओळखू शकलं नाही. 'द रोडसाइड उस्ताद' नावाने हा व्हिडीओ युट्यूबवर शेअर करण्यात आला होता. या प्रयोगाचा उद्देश लोकांची खरी प्रतिक्रिया जाणून घेणं होता.
हे ही वाचा: 'तू दाखवून दिलंस…' सचिन- सुप्रियाचा लेक श्रियासाठी खास मेसेज, म्हणाले...
मुंबईतील विविध ठिकाणी वृद्ध व्यक्तीच्या रुपात बसून सोनूचा गाणी गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. अनेक लोक त्याच गाणं तल्लीन होऊन ऐकत होते. इतकंच नव्हे तर एका तरुणाने त्याचं गायन रेकॉर्ड करून त्याचे कौतुकही केलं. गाणं संपल्यानंतर त्याने सोनूला प्रेमाने विचारलं - 'तुम्ही जेवलात का?' आणि त्याला 12 रुपये दिले. या प्रसंगाने सोनू भावूक झाला. त्याने सांगितलं - 'मला ओळखत नसतानाही त्या तरुणाने मला प्रेमाने पैसे दिले. हे पैसे माझ्यासाठी लाखो रुपयांइतके मौल्यवान आहे. मी ते फ्रेम करून ऑफिसमध्ये जपून ठेवले आहेत.'
सोनू पुढे म्हणाला की, या व्हिडीओसाठी त्याने स्वतःला पूर्णपणे हरवलं आणि मेकअपमुळे कोणीही त्याला ओळखू शकणार नाही हे त्याला माहीत होतं. या प्रोजेक्टचा उद्देश लोकांमध्ये संगीताविषयी प्रेम जागं करणं होता, असं या व्हिडीओचे निर्माता कार्ल कॅटगेरा यांनी सांगितलं.