भारतात प्रसिद्ध पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमचे यूट्यूब अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे. तसेच त्याचे इन्स्टाग्राम अकाउंटही भारतात दिसणार नाही. हे पाऊल त्याच्या लाखो भारतीय चाहत्यांसाठी निश्चितच धक्कादायक आहे. आतिफ अस्लम याच्याआधीही भारतात त्याच्या गाण्यांवर अनौपचारिक बंदी घालण्यात आली होती. मात्र यावेळी थेट सोशल मीडिया अॅक्सेसवर मर्यादा आणण्यात आल्या आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याची पार्श्वभूमी
22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे टुरिस्टवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. ही घटना अतिशय क्रूर पद्धतीने घडवण्यात आली होती. या भयंकर घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. नागरिक, सामाजिक संस्था आणि राजकीय नेते पाकिस्तान दहशतवाद्यांविरोधात कठोर पावलं उचलण्याची मागणी करत आहेत.
पाकिस्तानी कलाकारांवर बंदी
या संतापाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकांउंटवर भारतात बंदी घालण्याचे पाऊल उचलले आहे. हानिया आमिर, माहिरा खान, आयेजा खान, सनम सईद, इकरा अजीज यांसारख्या लोकप्रिय अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सच्या इन्स्टाग्राम अकाउंट्सवर भारतात बंदी आणण्यात आली आहे आणि आता आतिफ अस्लमच्या अकाउंटवरही बंदी घालण्यात आली आहे. हे सर्व कलाकार भारतातही लोकप्रिय होते, पण आता त्यांच्या कंटेंटवर भारतीय युजर्सना प्रवेश नाही.
हे ही वाचा: 'स्त्री 2' नंतर श्रद्धा कपूरला मिळाला मोठा प्रोजेक्ट; मानधनाबरोबर मिळणार नफ्यातील वाटा
आतिफ अस्लमचं बॉलिवूडमधील योगदान
आतिफ अस्लमने 2002 मध्ये 'जल' या बँडच्या माध्यमातून संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. त्याचे 'आदत' हे गाणं पाकिस्तान आणि भारतातही प्रचंड गाजलं. त्यानंतर त्याने 'वो लम्हे', 'पहली नजर में', 'तेरा होने लगा हूं', 'तू जाने ना', 'जीना जीना', 'दिल दिया गल्ला' यांसारखी अनेक सुपरहिट हिंदी गाणी दिली. त्याचा आवाज रोमँटिकसाठी विशेष ओळखला जातो.
पाकिस्तानी कलाकारांवर भारतीय मनोरंजन विश्वात पूर्वीपासून निर्बंध
2016 मध्ये उरी हल्ल्यानंतरही भारतात पाकिस्तानी कलाकारांवर अघोषित बंदी घालण्यात आली होती. फवाद खान, माहिरा खान यांच्यासारख्या कलाकारांना भारतात काम देणे बंद झाले. आताही पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही कठोर पावले उचलण्यात आली आहेत.