Marathi News> मनोरंजन
Advertisement

RRR मधील 'नाटू नाटू' गाण्याला Golden Globes पुरस्कार मिळल्याबद्दल PM मोदींनी व्यक्त केला आनंद; म्हणाले, "या प्रतिष्ठेच्या सन्मानामुळे..."

टेलर स्विफ्ट, रिहाना आणि लेडी गागासारख्या आघाडीच्या अंतरराष्ट्रीय गायिकांच्या गाण्यांना मागे टाकत 'आरआरआर' चित्रपटामधील 'नाटू नाटू' या गाण्याने सर्वोत्तम गाण्याचा पुरस्कार पटकावला.

RRR मधील 'नाटू नाटू' गाण्याला Golden Globes पुरस्कार मिळल्याबद्दल PM मोदींनी व्यक्त केला आनंद; म्हणाले,

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (११ जानेवारी २०२३ रोजी) देशातील तमाम चित्रपट चाहत्यांबरोबर एका अनोख्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले. अमेरिकेत पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या 'गोल्डन ग्लोब्स' पुरस्कार सोहळ्यात 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला सर्वोत्तम गाण्याचा पुस्कार मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी या चित्रपटाशी संबंधित व्यक्तींचं अभिनंदन केलं आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन पंतप्रधान मोदींनी "हे फार खास यश आहे," असं म्हटलं आहे. तसेच, "या प्रतिष्ठेच्या सन्मानामुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतोय," असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

आज अमेरिकेतील लॉस ऐंजलिस येथे पार पडलेल्या 'गोल्डन ग्लोब्स २०२३' पुरस्कार सोहळ्यात 'आरआरआर'मधील 'नाटू नाटू' गाण्याला सर्वोत्तम गाण्याचा पुरस्कार मिळाला. मैत्रीचं विशेष नातं भन्नाट डान्सच्या माध्यमातून दाखवणाऱ्या या गाण्याने आंतरराष्ट्रीय मंचावर अनेक दिग्गज कलाकारांच्या गाण्यांना धोबीपछाड देत पुरस्कारावर नाव कोरलं. टेलर स्विफ्ट, रिहाना आणि लेडी गागासारख्या आघाडीच्या गायिकांच्या गाण्यांना मागे टाकत 'नाटू नाटू'ने हा पुरस्कार पटकावला.

'नाटू नाटू'ला मिळालेल्या या पुस्कारानंतर सोशल मीडियावर या चित्रपटाचे निर्माते, कलाकार आणि संगीतकारांबरोबरच संपूर्ण टीमवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या टीमला शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये पंतप्रधान मोदीही सहभागी झाले आहेत. "हे फार खास यश आहे. एमएम करवानी, प्रेम रक्षित, काल भैरवा, चंद्राबोस, राहुल सिपलिगुंज यांचं कौतुक वाटतं. तसेच मी एसएस राजमौली, ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि 'आरआरआर' चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो. या प्रतिष्ठेच्या सन्मानामुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतोय," असं ट्वीट पंतप्रधान मोदींनी केलं आहे. 


२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आरआरआर'ने एकूण 1200 कोटींहून अधिकची कमाई केली आहेत. त्यातच आता या पुरस्कारामुळे या चित्रपटाच्या शिरपेचात नवा मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Read More