दिवंगत बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी नेहमीच आपण या इंडस्ट्रीत कसे योग्य नव्हतो असं अनेकदा सांगितलं होतं. जेव्हा बॉलिवूडमध्ये अॅक्शन चित्रपटांची चलती होती, तेव्हा ते रोमँटिक हिरोंची भूमिका निभावत होते. पण तरीही ऋषी कपूर यांनी 1990 मध्ये बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. वय होऊ लागल्यानंतर त्यांनी सहाय्यक भूमिका करण्यास सुरुवात केली. मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत असताना ऋषी कपूर यांनी अनेक अभिनेत्रींसह काम केलं. पूनम ढिल्लोन यांच्यासोबत त्यांनी ये वादा रहा, बिवी ओ बिवी, जमाना अशा चित्रपटांमध्ये काम केलं. नुकतंच एका मुलाखतीत त्यांनी ऋषी कपूर फार सहज अभिनेते होते, मात्र कधीकधी सेटवर फार चिडचिड आणायचे असं सांगितलं आहे.
हिंदी रशशी संवाद साधताना पूनम ढिल्लोन यांनी ऋषी कपूर हे समजूतदार आणि नैसर्गिक अभिनेते होते असं सांगितलं आहे. आपण कधीकधी नितू कपूर यांच्याकडे ऋषी कपूर यांची तक्रार करायचो असा खुलासाही त्यांनी केला आहे. "मी नितूकडे तक्रार करायची, कारण ते कधीकधी फार चीड आणायचे, आम्हाला ओरडायचे. कारण आम्ही त्यांच्यासमोर मुलं होतो," असं त्यांनी सांगितलं आहे.
पूनम या ऋषी कपूर यांच्यापेक्षा वयाने 10 वर्षं लहान होत्या. पण तरीही त्यां नी अनेक चित्रपटांमध्ये रोमँटिक भूमिका साकारल्या. पूनम यांनी सांगितलं की, "ऋषी कपूर अनेकदा सेटवर आपलं भाषा कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न करत असत. आपल्या अवतीभओवती असणारे आपल्याइतकं चांगल इंग्रजी बोलू शकत नाहीत असं त्याना वाटत असे".
"ते फार इंग्लिश टाइप होते. त्यांना आपल्या इंग्रजीचा फार अभिमान होता. ते नेहमी टाइम मॅगजीन वाचत असत. त्यामुळे त्यांना नेहमी असं वाटायचं की, सेटवर आपणच सर्वोत्तम वाचणारे आहोत. आधी आम्ही त्यांना घाबरायचो. पण नंतर त्यांच्यासोबत वेळ घालवल्यानंतर आत्मविश्वास आला. नंतर मी त्यांना सांगायचे तुम्ही दहावी नापास आहात आणि मी पदवीधर आहे. त्यांनी तर दहावीही पूर्ण केलेली नाही. त्यामुळे मी त्यांना उगाच इंग्लिश झाडू नका असं सांगायची," अशी आठवण पूनम यांनी सांगितली.
त्यांच्या आठवणींना उजाळा देताना, पूनम यांनी सांगितलं की जेव्हा ते त्यांचे 'खुल्लम खुल्ला: ऋषी कपूर अनसेन्सर्ड' हे आत्मचरित्र लिहित होते, तेव्हा त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील योगदानाबद्दल आभार मानण्यासाठी फोन केला होता. "ते म्हणाले, 'मला फक्त तुमचे आभार मानायचे होते'. मी विचारले, 'कशासाठी?' ते म्हणाले, 'मी प्रत्यक्षात माझे पुस्तक लिहित आहे आणि मी ज्या सर्व नायिकांसोबत काम केले आहे त्यांना आठवत आहे, त्या सर्वांनी माझ्या आयुष्यात, माझ्या कारकिर्दीत, प्रत्येक गोष्टीत योगदान दिले आहे म्हणून मी माझ्या प्रवासाचा भाग असल्याबद्दल तुमचे आभार मानू इच्छित होते'. हे खूप गोड होते. मी खूप भावूक झाले होते."