Prachi Pisat Message Row: गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीत एकाच विषयांवर चर्चा आहे. जेष्ठ अभिनेते सुदेश म्हशीलकर यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन अभिनेत्री प्राची पिसाट हिला काही मेसेज करण्यात आले होते. प्राचीने या मेसेजचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सुदेश म्हशीलकर यांनी प्राचीला आक्षेपार्ह मेसेज केले, असा दावा तिने केला होता. या सगळ्या प्रकरणांवर आता सुदेश यांनी मौन सोडलं आहे. प्राचीच्या आरोपांवर त्यांनी उत्तर दिलं आहे.
सुदेश यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नेमकं काय घडलं हे त्यांना सविस्तरच पोस्टमध्ये मांडलं आहे. सुदेश यांनी म्हटलं आहे की, 'खरंतर मी ह्या विषयावर काहीही लिहिणार नव्हतो. पण गेले काही दिवस जे काही सोशल मीडियावर सुरू आहे, त्यावर अनेक लोकांचे, मिडियाचे प्रतिसाद पाहून शांत बसणं मला शक्य झालं नाही. म्हणून आज इथे माझं म्हणणं मुद्द्यांनुसार मांडत आहे.'
1) 'हा मेसेज खरंच मीच केला का?'
तो मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला आहे. पण तो नेमका केव्हा? कसा गेला? कोणीतरी अकाउंटमध्ये शिरलं का? की कुठे गैरवापर झाला? याचा मला पत्ता नाही. त्याबाबतीत मी लेखी तक्रार दाखल केली आहे, ती मी इथे जोडत आहे.
आणि जर कुणी असं म्हणत असेल की त्यांनी माझं अकाउंट हॅक झालं का ते तपासलं, तर ती अतिशय गंभीर बाब आहे. माझं सोशल मीडिया अकाउंट ही माझी वैयक्तिक माहिती आहे त्यात परवानगीशिवाय हस्तक्षेप करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.
2) 'अश्लील मेसेजेस केल्याचा आरोप'
मी इथे माझ्या फोनमधील मूळ चॅट्सचे स्क्रीनशॉट्स जोडत आहे. ज्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे हास्यविनोदाच्या स्वरात लिहिलेलं असं दिसेल. जर खरंच मी असा मेसेज केला असता आणि तो इतका आक्षेपार्ह असता, तर त्यावर प्रतिक्रिया देताना 'असं का पाठवलं?' एवढं तरी कुणीही विचारलं असतं. पण इथे उलट, मेसेजचा संदर्भ तोडून, त्यातून चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न झाला आहे. लोकांना अर्धवट माहिती देऊन अश्याप्रकारे दिशाभूल करणं हे सुद्धा चुकीचं आहे.
3) 'फ्लर्टिंगसाठी नंबर मागितला का?'
माझ्या फोनमध्ये ‘Prachi Pisat’ ह्या नावाने आधीच नंबर सेव्ह आहे. मला त्यासाठी फेसबुकवर नंबर मागायची गरजच नव्हती. ज्यादिवशी पोस्ट आली त्यादिवशी शहानिशा करण्यासाठी प्राचीला कॉल केला होता पण तिने घेतलाच नाही.
4) 'पाच दिवस उत्तर का दिलं नाही?'
मी फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो. माझं शूटिंग, माझं काम, आणि बाकी वेळ माझ्या कुटुंबीयांसोबत जातो. माझी पत्नी कॅन्सर पेशंट आहे, आणि माझी मुलंही ह्याच इंडस्ट्रीत काम करतात. या घटनेमुळे त्यांच्यावर किती मानसिक ताण आला असेल, याची कल्पनाही मला कदाचित करता येणार नाही. हे सगळं पाहून मीही थोडा गोंधळलो होतो कुठून सुरूवात करावी हे समजत नव्हतं.
5) 'प्राचीला कॉल करून पोस्ट काढायला धमकावलं?'
माझ्या काही जवळच्या मित्र-मैत्रिणींनी फक्त काळजीपोटी तिला कदाचित मेसेज किंवा कॉल केला असेल तर मला माहित नाही. कारण मी स्वतः कुणाला असं करायला सांगितलं नाही.
6) 'बाकी पोरींनी सांगितलेले किस्से व्हायरल करण्याची धमकी?'
‘सेक्सी’ म्हणावं असं खरं सौंदर्य आणि समजूत माझ्या आयुष्यातल्या अनेक मैत्रिणींमध्ये आहे. ज्या माझ्या पत्नीला सुद्धा ओळखतात. त्या आजही आवर्जून आमच्याकडे येतात, आणि माझ्या पत्नीच्या हातचं जेवण प्रेमाने खातात आपण जेव्हा एकत्र काम करत होतो तेव्हा तू सुद्धा तिच्या हातचं जेवलीयस. या सगळ्या गोष्टींबद्दल कुणाला काही तपासायचं असेल, कुणाला काही विचारायचं असेल तर माझी अजिबात हरकत नाही.
प्रतिष्ठा ही काचेसारखी असते पारदर्शक, पण नाजूक. कोणीतरी एक दगड फेकतो आणि आरसा मोडतो.आज तो क्षण मी गाठलाय आणि तो शांतपणे पाहतोय.वैयक्तिक पातळीवर एवढंच सांगावंसं वाटतं की जर हे सर्व केवळ बदनामीसाठी केलं जात असेल, तर ते नक्कीच खेदजनकआहे. मी हा विषय इथे संपवत आहे. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्यांचे मनःपूर्वक आभार.