Vin Dogatli Hi Tutena : झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पूर्णिमा डे आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पूर्णिमा डे लवकरच झी मराठीवर सुरू होणाऱ्या ‘वीण दोघातली ही तुटेना’ या मालिकेत अधिरा राजवाडे ही खास भूमिका साकारणार आहे.
अभिनेत्री अधिरा राजवाडे ही श्रीमंत, आत्मविश्वासू, हट्टी, बिनधास्त आणि फॅशन डिझायनर बनण्याची स्वप्न पाहणारी GenZ तरुणी आहे. तिचं आपल्या पिंट्या दादावर म्हणजेच सुबोध भावे साकारत असलेल्या भूमिकेवर अमाप प्रेम आहे. खास म्हणजे पूर्णिमा डे आणि सुबोध भावे पुन्हा एकदा एकत्र झळकणार असून, यावेळी ते भाऊ- बहीण म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.
पूर्णिमा डेने तिच्या भूमिकेबाबत सांगितलं की, अधिरा राजवाडे ही खूप श्रीमंत घरातली मुलगी आहे. तिला पैशाचा माज आहे पण प्रेमाबद्दल ती प्रचंड पॅशनेट आहे. ती आपल्या दादाला बाबा मानते आणि त्याच्यावर जीवापाड प्रेम करते. रोहितवरही तिचं मनापासून प्रेम आहे आणि त्याच्यासाठी ती काहीही करू शकते.
या मालिकेच्या प्रोमो शूटच्या आठवणी शेअर करताना पूर्णिमा डेने म्हणाली की, आम्ही सर्व एकत्र होतो. गप्पा, खाणं आणि धमाल करत आम्ही मालिकेचा प्रोमो शूट केला. अधिरा राजवाडेचा लूक मला खूप आवडला. सेटवर माझी पूर्वीपासूनची मैत्री असलेली मंडळी म्हणजे सुबोध दादा, चंदू सर, विनायक सर, मंदार आहेत. त्यात आता तेजू, सुलभा ताई, किशोरी ताई यांची भर पडली आहे. शर्मिला शिंदेशी लगेचच छान मैत्री झाली. आमचे मेकअप पाउचही सेम आहेत.
राज मोरे या मालिकेत रोहितची भूमिका साकारणार आहे आणि त्याच्यासोबतही पूर्णिमा डेचे अनेक सीन असणार आहेत. त्यांच्या मैत्रीत हळूहळू गहिरेपण येणार असल्याचे संकेत ती देते. 'वीण दोघातली ही तुटेना' ही मालिका भावनिक नात्यांची गुंफण आणि आधुनिक तरुणाईच्या जीवनातील विविध पैलूंना स्पर्श करणारी ठरणार आहे.
पूर्णिमा डेच्या या नव्या भूमिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल यात शंका नाही. या मालिकेत प्रेक्षकांना एक छान गोष्ट आणि व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहेत. 'वीण दोघातली ही तुटेना' 11 ऑगस्ट पासून दररोज 7.30 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.