Raid 2 Teaser : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा 2018 मध्ये 'रेड' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा दुसरा भाग आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अजय देवगण हा इनकम टॅक्स ऑफिसवर अमय पटनायकच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगणनं पहिल्या चित्रपटात रामेश्वर सिंग उर्फ ताऊजी यांच्या घरी रेड टाकली होती. ताऊजींच्या घरातून ब्लॅक मनी काढण्यासाठी अमय आणि त्याच्या टीमनं ताऊजीच्या घरातील भिंती देखील तोडल्या. आता अमय पुन्हा एकदा येतो आणि यावेळी तो दादा भाई नावाच्या एका राजकारण्याच्या घरात रेड टाकणार आहे.
'रेड 2' चा टीझर प्रदर्शित झाला आहे. यात अजय देवगण पुन्हा एकदा अमय पटनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. काळं शर्ट, ब्राउन पॅन्ट परिधान केला आहे आणि त्याच्या हातात सूटकेस घेऊन तो दादा भाईच्या घरात जात असल्याचं पाहायला मिळत आहे. अमय पटनायकची ही 75 वी रेड असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यासोबत त्याची टीम असते, जे काहीही झालं तर अमयसोबत असते.
टीझरमध्ये दादा भाईच्या भूमिकेत रितेश देशमुख दिसणार आहे. चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत रितेश देशमुख दिसणार आहे. राजकारणी म्हणून त्याचा एक वेगळाच रुबाब असल्याचं पाहायला मिळत आहे. लोकांच्या नजरेत तो चांगला असला तरी तो तितका चांगला नाही हे दिसून येत आहे. दादा भाईला त्याच्या जाळ्यात अडकवण्यासाठी अमय पटनायक कोणतं चक्रव्यूह रचणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या चित्रपटात अनेक गाजणारे डायलॉग आहेत.
हेही वाचा : Krrish 4 कन्फर्म याच चित्रपटातून हृतिक रोशन करणार दिग्दर्शनात पदार्पण
दरम्यान, या चित्रपटात अजय देवगण आणि रितेश देशमुखशिवाय वाणी कपूर, रजत कपूर, सौरभ शुक्ला, सुप्रिया पाठक, अमित सियाल, यशपाल शर्मा सारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. असं म्हटलं जातं की रवीना टंडन या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. वाणी कपूर ही अमय अर्थात अजय देवगणच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या भागात ही भूमिका इलियाना डीक्रूजनं साकारली होती. 'रेड 2' हा चित्रपट 1 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कुमार गुप्तानं केलं आहे.