Raj Thackeray A R Rehman Video: मराठीचा आवाज या कार्यक्रमाच्या निमित्ताने हिंदी भाषा शालेय शिक्षणामध्ये पहिल्या इयत्तेपासून समावेश करण्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये तब्बल 19 वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले. या कार्यक्रमात या दोन्ही भावांची भाषणं झाली. उद्धव ठाकरेंनी राजकीय टोलावटोलवी करत भाषण केलं तर राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा उचलून धरला. दाक्षिणात्य राज्यांमध्ये तेथील भाषांना कसं प्राधान्य दिलं जातं याबद्दल राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून अनेक मुद्द्यांना हात घातला. असं असतानाच त्यांनी ऑस्कर विजेता संगीतकार ए. आर. रेहमानचं उदाहरण दिलं. राज ठाकरेंनी जो प्रसंग सांगितला त्याचा व्हिडीओ आता राज यांच्या भाषणानंतर व्हायरल झाला आहे.
मराठीच्या मुद्द्यावर ठाकरेंच्या कुटुंबातील मुलं इंग्रजीमध्ये शिकली अशी टीका करणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरेंनी उत्तर दिलं. हिंदी सक्तीबद्दल बोलताना राज यांनी, "काहीही अंगावर लादायचा प्रयत्न करता. आता माघार घेतली ना मग वेगळ्या ठिकाणी वळवा प्रकरण! ठाकरेंची मुलं इंग्रजी मिडीयममध्ये शिकली, बरं शिकली मग पुढे काय?" असा सवाल राज यांनी विचारला. पुढे बोलताना, "दादा भुसे मराठी मीडियममध्ये शिकून शिक्षणमंत्री, फडणवीस इंग्रजीत शिकून मुख्यमंत्री झाले. कुठे काय शिकला याचा काय संबंध?" असा प्रश्नही राज यांनी भाषणादरम्यान विचारला. विचारला.
"कोणाकोणाची मुलं परदेशात शिकतात याद्या आहेत आमच्याकडे. त्याचं काय करणार? त्यातल्या त्यात मंत्रिमंडळातील मंत्र्याचं हिंदी ऐका फेफरं येईल," असं राज यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. "कोणीची मुलं कुठे शिकली हे असेल प्रश्न फक्त महाराष्ट्रात विचारले जातात," असा टोलाही राज यांनी लगावला.
"अजून एक गोष्ट सांगतो. आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलो, आमची मुलं इंग्रजी मिडियममध्ये शिकली. यांची मुलं इंग्रजी मिडियममध्ये शिकली मग यांना मराठीचा पुळका कसा? सन्माननिय बाळासाहेब ठाकरे, माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकलेले आहेत. या दोघांवर तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का?" असा सवाल राज यांनी उपस्थित केला. "लालकृष्ण अडवाणी ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकले. त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का. अडवाणी कॉनव्हेंट स्कूलमध्ये शिकलेत," असं राज म्हणाले.
पुढे राज ठाकरेंनी ए. आर. रेहमानबद्दलचा एक किस्सा सांगितला. "रेहमान स्टेजवर असताना त्या बाई कानडीमध्ये बोलत होता. त्या बाई अचानक हिंदीत बोलू लागल्या. ए. आर. रेहमानने त्यांच्याकडे पाहिलं म्हटलं हिंदी. ए. आर. रेहमान खाली स्टेजवरुन खाली उतरले. तुमचा कडवटपणा तुम्ही शिक्षण कुठे घेतलं यावर नसतो तो आत असावा लागतो," असं राज म्हणाले. राज यांनी सांगितलेल्या या प्रसंगाचा व्हिडीओ आता व्हायरल होतोय.
"दक्षिण भारतात तमीळ, तेळगुच्या प्रश्नावर कडवटपणे उभे राहतात. तिथे कोणी विचारत नाही तुमची मुलं कोणत्या भाषेत शिकली. उद्या मी हिब्रू भाषेत शिकेल, मराठीचा अभिमान बाळगेन काही अडचण आहे का?" असा सवाल राज यांनी उपस्थित केला. राज यांनी दक्षिणेमधील इंग्रजी भाषेत शिकलेल्या मान्यवरांची यादीच वाचून दाखवली. "दक्षिणेतले इंग्रजीत शिकलेले नेते आणि अभिनेते कोणते हे सांगतो," असं म्हणत राज यांनी जय ललिता, स्टॅलिन, कन्निमोळी, उदयनिधी, चंद्रबाबू नायडू, पवन कल्याण, नारा लोकेश (एनटीआरचा नातू), कमल हसन, अभिनेता विक्रम, अभिनेता सूर्या, ए. आर. रेहमान यांचा उल्लेख करत त्यांच्या शाळा कोणत्या होत्या हे नावासहीत सांगितलं.