Ramayana Movie Teaser: रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा पहिला लूक रिलीज होताच सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आला आहे. या लूकमध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसत आहे. पोस्टरच्या पार्श्वभूमीत दिसणारा सूर्य आणि ढगांचा देखावा अंगावर काटे आणत आहे.
तसेच, या मोशन पोस्टरमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार यश रावणाच्या भूमिकेत झळकत आहे. या टीझरमध्ये रणबीर म्हणजेच प्रभू श्रीराम रावणाकडे बाण सोडताना दिसत आहे. या चित्रपटाचे निर्माता नमित मल्होत्रा यांनी हे मोशन पोस्टर त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. त्यासोबत त्यांनी दिलेले कॅप्शन चाहत्यांना प्रचंड आवडले आहे. त्यामुळे सर्वजण आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
'रामायण'च्या पहिल्या लूकचे वैशिष्ट्ये
हे पोस्टर शेअर करताना नमित मल्होत्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, 'दहा वर्षांची आकांक्षा. आतापर्यंत लिहिलेले सर्वात मोठे महाकाव्य जगासमोर आणण्याचा दृढनिश्चय. जगातील काही सर्वोत्तम लोकांसोबत केलेल्या सहकार्याची पावती म्हणजे 'रामायण' अत्यंत अभिमानाने सादर करीत आहोत. चला या अमर राम विरुद्ध रावणाच्या कहाणीला एकत्र साजरे करूया. आपले सत्य, आपला इतिहास.'
चित्रपट दोन भागांत होणार प्रदर्शित
रणबीर कपूर आणि यशसोबतच साई पल्लवी या चित्रपटात सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार असून, पहिला भाग 2026 मध्ये तर दुसरा भाग 2027 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या तिघांशिवाय चित्रपटात आणखी अनेक मोठ्या कलाकारांचा समावेश आहे. सनी देओल- हनुमान, रवी दुबे-लक्ष्मण, तर रकुल प्रीत सिंह शूर्पणखेच्या भूमिकेत दिसणार आहेत.
बिग बजेट आणि दमदार स्टारकास्ट
काजल अग्रवाल मंदोदरी तर लारा दत्ता कैकेयीची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी करत असून निर्मिती नमित मल्होत्रा करत आहेत. हा चित्रपट जवळपास 500 ते 600 कोटींच्या बजेटमध्ये तयार होत असल्याचे समजते. फक्त एका सेटसाठीच जवळपास 11 कोटी खर्च झाल्याची माहिती आहे. इतके भव्य बजेट आणि शानदार टीम असल्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
रावणाच्या भूमिकेसाठी यशचे खास आकर्षण
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कलाकार खूप मेहनत घेत आहेत आणि त्यांचे फोटो तसेच व्हिडीओ वारंवार सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रावणाच्या भूमिकेबद्दल यशने एका मुलाखतीत सांगितले की, रावणाची व्यक्तिरेखा त्याला खूपच अनोखी वाटते. जर त्याला रामायणातील इतर कोणतीही भूमिका करायला सांगितली असती, तरी त्याने ती केली नसती, कारण रावणाचीच व्यक्तिरेखा त्याला सर्वात जास्त आकर्षित करते.