Filmistan studio sold : मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील फिल्मीस्तान स्टुडिओ लवकरच पाडला जाणार आहे. अनेक प्रसिद्ध चित्रपट, मालिका आणि रिअॅलिटी शोना व्यासपीठ देणारा हा स्टुडिओ राणी मुखर्जी आणि काजोल यांचे आजोबा शशधर मुखर्जी आणि अशोक कुमार यांनी 1940 मध्ये मध्ये सुरू केला होता. मात्र, 85 वर्षांनंतर हा स्टुडिओ आता विकण्यात आला आहे. फिल्मीस्तान स्टुडिओ हा तोलाराम जालान यांच्या पत्नी नीना जालान यांच्या नावावर होता.
दरम्यान, आता त्यांनी हा स्टुडिओ रिअल इस्टेट कंपनी आर्केड डेव्हलपर्सला 183 कोटी रुपयांना विकला आहे. आता फिल्मीस्तान स्टुडिओ पडला जाणार आहे. त्या जागेवर 3000 कोटी रुपयांचा निवासी प्रकल्प बांधला जाणार आहे.
फिल्मीस्तान स्टुडिओची विक्री, सिनेसृष्टी भावुक
मुंबईतील गोरेगाव येथील फिल्मीस्तान स्टुडिओची नोंदणी 3 जुलै रोजी करण्यात आली आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, रिअल इस्टेट कंपनी आर्केड डेव्हलपर्स या ठिकाणी 3 हजार कोटी रुपयांचा लक्झरी अपार्टमेंटचा प्रकल्प सुरू करणार आहे. हा प्रकल्प 2026 पासून सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी 50 मजली इमारतीत 3,4 आणि 5 बीएचके फ्लॅट आणि पेंटहाऊस बांधले जाणार आहेत. हा स्टुडिओ विकला असल्यामुळे या ठिकाणी काम केलेले अनेक कलाकार भावुक झाले आहेत.
ऑल इंडिया सिने वर्कर्सकडून विक्रीवर बंदीची मागणी
मुंबईतील फिल्मीस्तान स्टुडिओच्या विक्री झाल्याची बातमी येताच सिनेसृष्टीमधील अनेक कलाकार भावुक झाले. या बातमीनंतर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने फिल्मीस्तान स्टुडिओच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, चित्रपट उद्योगातील अनेक कामगार या स्टुडिओमधून आपला उदरनिर्वाह करतात. त्याच्या विक्रीवर बंदी घालावी. या स्टुडिओमुळे इंडस्ट्रीमधील अनेक मजुरांचं घर चालतं. याआधी देखील स्टुडिओ विकले गेली आहेत. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या स्टुडिओमध्ये अनेक चित्रपटांचं शूटिंग झालं आहे. ज्यामध्ये तुमसा नही देखी आणि जागृती या सिनेमांचं शूटिंग झालं असून या चित्रपटांना फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता. त्यासोबतच या ठिकाणी अनेक प्रसिद्ध मालिकांचं देखील शूटिंग झालं आहे.