Rape Scene In Bollywood Film: कथानकाची गरज पाहता अनेक कलाकृतींमध्ये काही अशी दृश्य समाविष्ट केली जातात जी दृश्यच कित्येकदा चर्चेचा विषय ठरतात. हिंदी चित्रपट जगतामध्ये कायमच काही मुद्दे अतिशय संवेदनशीलपणे हाताळण्यात येतात. शारीरिक अत्याचार हा मुद्दासुद्धा हिंदी चित्रपटांमध्ये अतिशय संवेदनशीलरित्या हाताळण्यात आला. असं असलं तरीही अशा दृश्यांच्या चित्रीकरणावेळी कलाकार मंडळींनाही अनेक आव्हानांचा सामना करावा लागला हेसुद्धा तितकंच खरं.
अनेकांनाच सेलिब्रिटी मंडळींचं आयुष्य कितीही रंजक वाटत असलं तरीही कामाचा भाग म्हणून एखादी कलाकृती साकारताना त्यांनाही कैक आव्हानांचा सामना करावा लागतो. अशाच एका चित्रीकरणावेळी एका अभिनेत्रीनं इतक्या कठीण परिस्थितीचा सामना केला की रेप सीन अर्थात बलात्काराचं दृश्य चित्रीत झाल्यानंतर तिचा थरकाप उडाला होता. ही अभिनेत्री म्हणजे हुमा कुरेशी.
'महारानी' या वेब सीरिजच्या चौथ्या पर्वामुळं चर्चेत असणाऱ्या हुमानं तिच्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली असून, यामध्ये ती एका महिला मुख्यमंत्र्यांच्या रुपात झळकत आहे. याच हुमा कुरेशीनं 'बदलापूर' नावाच्या चित्रपटातही काम केलं होतं. जिथं ती, एका देहविक्री करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत झळकली होती. 'झिमली' असं तिनं साकारलेल्या पात्राचं नाव. याच चित्रपटामध्ये हुमानं रेप सीनही केला होता.
हा सीन इतका आव्हानात्मक होता की, त्याच्या चित्रीकरणादरम्यान हुमानं बऱ्याच अडचणींचा सामना केला, या सीनचा विचारच हुमाला खचवणारा होता. 'एका देहविक्री करणाऱ्या महिलेविषयी किती सहजपणे पूर्वग्रह बांधले जातात... त्यांच्यावर सतत शारीरिक अच्याचार होत असतात. पण, मुळात त्यासुद्धा एक मनुष्य आहेत....' असं हुमा एका मुलाखतीदरम्यान म्हणाली होती. या सीनच्या चित्रीकरणानंतर जेव्हा हुमा सेटवरून बाहेर आली तेव्हा तिचे हात थरथरत होते... तिनं कसंबसकं या धक्क्यातून स्वत:ला सावरल्याचंही मुलाखतीत सांगितलं होतं.
फक्त हुमा कुरेशीच नव्हे तर आलिया भट्ट, राणी मुखर्जी, करीना कपूर खान यांसारख्या अभिनेत्रींनीसुद्धा रुपेरी पडद्यावर अशा भूमिका साकारल्या होत्या.