सध्या रमजानचा महिना असून यादरम्यान ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत रझा मुराद यांच्या हातात दारुचा ग्लास असून ते मद्यपान करताना दिसत आहेत. व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यांना रमजानच्या पवित्र महिन्यात मद्यपान करत असल्याने सुनावलं आहे. मात्र आपण मद्यपान करत नव्हतो तर दिल्लीत एका वाढदिवसाच्या सीनचं शूटिंग करत होतो असं स्पष्टीकरण रझा मुराद यांनी दिलं आहे. रझा मुराद यांनी कमेंट सेक्शनमध्ये पोस्ट शेअर करत आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. तो शुटिंगमधील सीन असून तिथे माझा नाही तर माझ्या पात्राचा वाढदिवस साजरा करत होतो असं त्यांनी सांगितलं आहे. रझा मुराद यांचा वाढदिवस नोव्हेंबरमध्ये असतो.
रझा मुराद यांनी स्पष्टीकरण देताना लिहिलं आहे की, "कृपया तुम्ही ही दारुची किंवा वाढदिवसाची पार्टी आहे असं समजू नका. ही एका प्रोडक्शनमध्ये सुरु असलेल्या चित्रपटातील क्लिप आहे, जिचं शुटिंग दिल्लीत सुरु होतं. चित्रपटातील माझ्या पात्राचा वाढदिवस साजरा केला जात आहे. हा चित्रपटातील सीन आहे. तुम्ही उगाच त्याला दारु पार्टी समजत आहात. माझा वाढदिवस 23 नोव्हेंबरला असतो आणि हा मार्च महिना सुरु आहे.".
पुढे त्यांनी लिहिलं आहे की, "तुम्ही लोक उगाचच रमजानच्या महिन्यात आम्ही खुलेआम दारु पित आहोत असं समजत आहात, जे चुकीचं आहे. हा फक्त एका चित्रपटाच्या शुटिंगमधला सीन आहे".
ज्येष्ठ अभिनेते किरण कुमार यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "मित्र जितके जुने, मैत्री तितकी घट्ट! जेव्हा तुम्ही मित्रांसह काम करत असता तेव्हा रिअल आणि रीलमधील अंतर बाजूला होतं".
रझा मुराद तीन दशकांहून जास्त काळ हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. बाजीराव मस्तानी, पद्मावत, फिलौरी या चित्रपटांमध्ये ते दिसले होते.