बॉलिवूड बिग बी अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या प्रमुख भूमिका असणारा 'बागबान' चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता. रवी चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सलमान खान, महिमा चौधरी यांच्यासह अनेक कलाकार होते. कौटुंबिक ड्रामा असणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. चित्रपटाने जवळपास 43 कोटींचा गल्ला जमवला होता. आजही तरुणांसह वडीलधारी माणसं तितक्याच आवडीने हा चित्रपट पाहतात. आई-वडील आणि मुलांच्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आजच्या जमान्यातही तंतोतंत जुळणारा आहे. खासकरुन अमिताभ यांनी साकारलेली राज आणि हेमा मालिनी यांनी साकारलेली पूजा ही भूमिका प्रेक्षकांच्या मनाला भावली होती.
रवी चोप्रा यांच्या पत्नी रेणु चोप्रा यांनी चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान घडलेले काही किस्से सांगितले आहेत. हेमा मालिनी या चित्रपटात फार गुंतलेल्या होत्या असंही त्यांनी सांगितलं आहे. कशाप्रकारे हेमा मालिनी यांनी राज आणि पूजा यांच्यातील नातं फुलवण्यात मदत केली होती याची आठवण त्यांनी सांगितली आहे.
पिंकविलाशी साधलेल्या संवादात रेणु चोप्रा यांनी सांगितलं की, "चित्रपटात एक सीन आहे ज्यामध्ये हेमा मालिनी आरशासमोर उभ्या राहून तयारी करत असतात. त्यावेळी अमिताभ मागून येतात आणि तिला पाहिल्यानंतर सुंदर अशी कमेंट करतात. यानंतर हेमा मालिनी त्यांना आपल्या ब्लाऊजची नाडी घट्ट बांधण्यास सांगतात. ज्यावेळी अमितजी येतात तेव्हा ते वेगाने ब्लाऊजची नाडी बांधतात".
हेमा मालिनी यांनी सांगितलं की, "त्या स्पर्शामुळे मला जो लूक हवा आहे तो मिळतो. त्यांनी मला स्पर्श करणं महत्त्वाचं होतं. लग्नाच्या इतक्या वर्षांनीही होणाऱ्या त्या स्पर्शाला महत्त्व आहे. त्या खऱ्या आयुष्यात फार रोमँटिक आहेत".
दरम्यान हेमा मालिनी यांनी भारती एस प्रधान यांच्याशी झालेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, आईच्या आग्रहावरून त्यांनी बागबानमधील पूजाची भूमिका स्वीकारली. "बागबानच्या मुहूर्ताच्या आधी, बीआर चोप्रा मला भेटले आणि मला सांगितलं की त्यांना मी ही भूमिका उत्तम प्रकारे साकारावी अशी त्यांची इच्छा आहे. त्यांनी मला कथा सांगितली आणि मला वाटतं की, त्यांच्या आशीर्वादामुळेच चित्रपट चांगला झाला. आजपर्यंत लोक त्या चित्रपटाबद्दल बोलतात. मला आठवतं की जेव्हा मी रवी चोप्रांकडून कथा ऐकत होतो तेव्हा माझी आई माझ्यासोबत बसली होती. ते गेल्यानंतर मी म्हणाले, चार मोठ्या मुलांच्या आईच भूमिका करण्यास सांगत आहेत. मी हे सर्व कसं करु शकते? त्यावर माझी आई म्हणाली, 'नाही, नाही. तुला ते करायलाच हवे. कथा चांगली आहे".