बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध कुटुंब असणाऱ्या कपूर कुटुंबात नुकताच एक विवाहसोहळा पार पडला. अदर जैन (Adar Jain) आणि आलेखा अडवाणी (Alekha Advani) विवाहबंधनात अडकले आहेत. या लग्नातील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान यातील एक व्हिडीओने मात्र नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या व्हिडीओत रिद्धिमा कपूर सहानीची मुलगी समारा आपली आजी नीतू कपूर यांना फोटो काढत असताना धक्का देत बाजूला ढकलताना दिसत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी नाराजी जाहीर करण्यास सुरुवात केली होती.
व्हिडीओमध्ये रिद्धिमा, समारा आणि नीतू कपूर रेड कार्पेटवर एकत्र येताना दिसत आहेत. रेड कार्पेटवर आल्यानंतर तिघीही फोटोसाठी उभ्या राहतात. व्हिडीओत समारा फोटो काढताना आजी नीतू कपूर यांच्यापासून दूर उभी राहताना दिसत आहे. यामुळे त्यांच्यात नाराजी असल्याच्या चर्चा रंगल्या. काहींनी तर तिने नीतू कपूर यांना ढकललं असल्याचा दावा केला.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रिद्धिमाने यावर स्पष्टीकरण दिलं असून, ते फक्त पोझ देण्याचा प्रयत्न करत होते आणि कौटुंबिक कार्यक्रमाबद्दल फार उत्साही होते असं सांगितलं. समारा फोटो काढण्यासाठी उत्साही होती, तिने आजीला अजिबात ढकललं नाही असंही तिने म्हटलं आहे. हिंदुस्तान टाइम्सशी संवाद साधताना रिद्धिमाने सांगितलं की, "सगळं काही गोंधळामुळे झालं आहे. ती बिचारी मुलगी फक्त पोझ देण्याचा प्रयत्न करत होती. ती अजिबात नाराज नव्हती. ती फार उत्साही होती. ती कारमध्ये सतत म्हणत होती, ओह माय गॉड, तिथे खूप सारे फोटोग्राफर्स असतील, मी अशाप्रकारे पोझ करेन. फोटोग्राफर्स सतत आम्हाला एकत्र येण्यासाठी सांगत होते. पण तिला एकटीला पोझ द्यायची होती. तिने आपल्या आजीला अजिबात ढकललं नाही".
ऑनलाइन चर्चा पाहून समारा फारच गोंधळली असून, आपण कुठे आजीला धक्का दिला असा विचार करत आहे. समाराने आपण फक्त पोझ देण्याचा आणि आरामशीर उभं राहण्याचा प्रयत्न करत होते असं तिचं म्हणणं आहे. "तिचं असं झालं होतं की, मी कधी तिला धक्का दिला? मी फक्त पोझ देण्याच्या प्रयत्नात होते. मी हात लांब करुन आरामशीर उभं राहत होते. मी कोणालाही धक्का दिला नाही," असं तिने सांगितल्याची माहिती रिद्धिमाने दिली आहे.
रिद्धिमाने नमूद केलं की समारा तिच्या सार्वजनिक प्रतिमेबद्दल अधिक जागरूक होत आहे. तसंच पापाराझींनी तिला कसं वागावं हे सांगू नये असंही म्हटलं आहे. विमानतळावर समाराच्या खेळकर वर्तनामुळे टीका झाल्याच्या घटनेचाही दाखला दिला. मुलीवर याचा परिणाम व्हावा यासाठी आपण रोज तिच्याशी यासंदर्भात चर्चा करतो अशी माहितीही त्यांनी दिली.