Ruchi Gujjar Viral Video: मुंबईच्या अंधेरी वेस्टमधील सिनेपोलिस सिनेमा येथे 25 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘सो लॉन्ग व्हॅली’ या चित्रपटाच्या प्रीमियर शोदरम्यान घडलेल्या गोंधळामुळे अभिनेत्री रुचि गुर्जर अडचणीत सापडली आहे. याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात रुचि गुर्जरसह 6 जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
‘सो लॉन्ग व्हॅली’ या चित्रपटाचे निर्माते करण सिंह चौहान यांच्या तक्रारीनुसार अभिनेत्री रुचि गुर्जर कोणतीही पूर्वपरवानगी किंवा निमंत्रण न घेता चार महिलांबरोबर आणि खासगी अंगरक्षकांसह सिनेमा हॉलमध्ये घुसल्या आणि प्रीमियर शो सुरु होण्याच्या काही मिनिटांआधी त्यांनी त्याठिकाणी मोठा गोंधळ घातला. त्या जोरजोरात ओरडत होत्या की त्या हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाहीत.
निर्माता आणि सुरक्षारक्षकांवर हल्ला
निर्मात्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अभिनेत्री रुचि गुर्जरने निर्माते करण सिंह चौहान यांना अपशब्द वापरले, पैसे परत देण्याची मागणी करत धमकावले आणि हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता तिच्या अंगरक्षकांनी ढकलाढकली केली आणि स्वत: रुचि गुर्जरने चप्पल काढून करण सिंह चौहान यांच्यावर फेकली. तसेच, प्लास्टिकची बाटली फेकल्याचा आरोपही करण सिंह चौहान यांनी तक्रारीमध्ये केला आहे.
अभिनेत्रीवर कायदेशीर कारवाई
मुंबईतील ओशिवारा पोलीस ठाण्यात यापूर्वी रुचिने निर्माता करण सिंह चौहान यांच्याविरुद्ध 24 लाख रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. मात्र, आता तिच्यावर उलट आरोप झाले असून BNS च्या कलम 115(2), 118(1), 189(1), 189(2), 190, 191(1), 329(3), 351(2), आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. आता या घटनेचा चित्रपटाच्या प्रदर्शनावर काय परिणाम होईल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
रुची गुर्जरची चित्रपट निर्मात्याला मारहाण, नेमकं काय घडलं?#ruchigurjar pic.twitter.com/Im85Pk1ahh
— Soneshwar Patil (@soneshwar_patil) July 26, 2025
नेमकं काय घडलं?
‘So Long Valley’ या चित्रपटाचा प्रीमियर मुंबईत एका प्रसिद्ध थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. अनेक कलाकार, पाहुणे आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी या प्रीमियर शोसाठी उपस्थित असताना हे संपूर्ण प्रकरण घडले. सगळ्यांच्या समोर अभिनेत्रीने थेट निर्मात्याला मारहाण केल्यामुळे अनेकांनी त्याचे व्हिडीओ शूट केले आणि काही वेळातच हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला.