Ruchi Gujjar viral video: ‘So Long Valley’ या आगामी चित्रपटाच्या प्रीमियर कार्यक्रमात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अभिनेत्री रुची गुर्जर हिने चक्क कार्यक्रमादरम्यान चित्रपटाचे निर्माता करणसिंग चौहान यांना चापट मारल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे प्रीमियरमध्ये उपस्थित प्रेक्षकांमध्ये खळबळ उडाली आणि काही काळासाठी वातावरण पूर्णपणे गोंधळाचं बनलं.
मारहाणीचे नेमकं कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ‘So Long Valley’ या चित्रपटाचा प्रीमियर मुंबईत एका प्रसिद्ध थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. अनेक कलाकार, पाहुणे आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी या प्रीमियर शोसाठी उपस्थित असताना हे संपूर्ण प्रकरण घडले. सगळ्यांच्या समोर अभिनेत्रीने थेट निर्मात्याला मारहाण केल्यामुळे अनेकांनी त्याचे व्हिडीओ शूट केले आणि काही वेळातच हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला.
मारहाणीचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, अभिनेत्री रुची गुर्जर आणि करणसिंग चौहान यांच्यात काही आर्थिक किंवा करारासंबंधी मतभेद होते. याच कारणामुळे अभिनेत्रीचा संताप अनावर झाला आणि तिने कार्यक्रमाच्याच ठिकाणी आपली नाराजी व्यक्त करत थेट मारहाण केली असं बोललं जात आहे.
करण सिंह चौहानवर गुन्हा दाखल
रुचीच्या तक्रारीवरून, मुंबई पोलिसांनी करण सिंह चौहानविरुद्ध आयपीसीच्या कलम 318(4), 352 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रुचीने एफआयआरमध्ये व्यवहार तपशील, बँक खाते क्रमांक आणि तिच्या आर्थिक नुकसानाची संपूर्ण माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे आणि बँकिंग व्यवहार, कॉल रेकॉर्ड आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे तपासत आहेत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात लवकरच आरोपीला चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.
रुची गुर्जरची चित्रपट निर्मात्याला मारहाण, नेमकं काय घडलं?#ruchigurjar pic.twitter.com/Im85Pk1ahh
— Soneshwar Patil (@soneshwar_patil) July 26, 2025
या संपूर्ण प्रकरणावर अद्याप कुणीही अधिकृत वक्तव्य प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यासोबतच चित्रपटाच्या टीमकडूनही यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या घटनेमुळे 'So Long Valley' चित्रपटाच्या प्रदर्शनावर आणि प्रमोशनवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकारामुळे एकूणच चित्रपटसृष्टीतील वर्तणूक आणि व्यावसायिक संबंध या बाबतीत प्रश्न उपस्थित होत आहेत. पुढील काळात या घटनेचा तपशील आणि परिणाम काय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.